Breaking News

लढवय्या पँथर निमाला!

राजा ढाले यांचे निधन

मुंबई : प्रतिनिधी

आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते, दलित पँथरचे एक संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत, बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक आणि लेखक राजा ढाले यांचे मुंबईत अल्पशा आजाराने मंगळवारी (दि. 16)  सकाळी त्यांच्या विक्रोळीतील राहत्या घरी निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. ढाले यांच्या जाण्याने दलित चळवळ, बौद्ध साहित्यविश्व, आणि आंबेडकरी विचार चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना, चळवळीतील कार्यकर्ते आणि साहित्यिक व्यक्त करत आहेत. राजा ढाले यांचे पार्थिव विक्रोळीतील गोदरेज रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती त्यांच्या कन्या गाथा ढाले यांनी दिली.  राजा ढाले यांच्या पार्थिवावर उद्या (17 जुलै) दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असून, उद्या दुपारी 12 वाजता विक्रोळी पूर्व येथील त्यांच्या निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघणार आहे. ही अंत्ययात्रा विक्रोळीहून दादर येथील इलेक्ट्रीक स्मशानभूमी येथे दुपारी पोहोचणार आहे. राजा ढाले यांच्या निधनाचे वृत्त समजताच आंबेडकरी जनता आणि साहित्यक्षेत्रात दु:ख व्यक्त होत आहे.

दलित पँथरचे एक प्रमुख संस्थापक राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले एक वादळी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे.

-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवरदुःखाचा डोंगर कोसळला आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक, दलित पँथरचा महानायक हरपला आहे.

-रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply