Breaking News

दिवाळे गाव स्मार्ट व्हिलेज अंतर्गत अनेक सेवासुविधा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

बेकायदा बांधकामांच्या हव्यासापोटी नवी मुंबईतील अनेक गावांचा उकिरडा झालेला असताना उत्तर बाजूस असलेले मच्छीमार बांधवांचे शेवटचे गाव दिवाळे विविध सेवा सुविधांमुळे कात टाकत आहे.

या गावातील ग्रामस्थांसाठी आतापर्यंत पाच जेट्टी बांधल्या असून मासळी सुकविण्यासाठी मोकळी जागा, स्वाध्याय सभागृह, समाज मंदिर, भव्य मासळी व भाजी बाजारहाट, एकाचवेळी शंभर वाहनांसाठी वाहनतळ, उद्यान, बॅण्ड पथकासाठी प्राशिक्षण केंद्र, विरुंगळा केंद्र, व्यायामशाळा, ग्रंथालय, गावाला वळसा घालणारे रिंग रोड, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण कार्यालय, विविध कार्यक्रमांसाठी खुला रंगमंच अशा अनेक सुविधांनी हे गाव स्मार्ट होणार आहे. यासाठी येथील स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांनी आपला आमदार निधी या गावासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी येथील काही सुविधांचा लोकार्पण सोहळा होणार आहे.

नवी मुंबईतील 29 गावांची दुरवस्था आहे. नवी मुंबईत गावे आहेत पण गावात नवी मुंबई नाही असे वर्णन येथील असुविधांबद्दल केले जाते. त्यामुळे गावांचा सर्वागीण विकास करण्याचे मंदा म्हात्रे यांनी ठरविले असून दत्तक गाव योजनेला सुरुवात केली आहे. यासाठी दिवाळे गावाची निवड करण्यात आली असून येथील प्रकल्पग्रस्तांनी या विकासाला साथ देण्याची तयारी ठेवली आहे. त्यामुळेच गावाचे प्रवेशद्वार विद्रूप करणारी दुकाने, फेरीवाले, गॅरेज, स्वयंप्रेरणेने हटवली आहेत. गावात स्वाध्याय परिवाराचे अनुयायी असल्याने स्वाध्याय सभागृह बांधण्यात आले आहे.

या गावातील 90 टक्के ग्रामस्थ हे मासेमारी किंवा मासेविक्री करीत आहेत. त्यामुळे खांदेवाले, फगवाले, डोलकर अशा तीन प्रकारांतील मच्छीमारांसाठी तीने वेगवेगळया जेट्टी बांधण्यात आलेल्या आहेत. याशिवाय गणेश विसर्जन, दशक्रिया विधीसाठी दोन स्वतंत्र जेट्टी उभारण्यात आलेल्या आहेत.

हे गाव समुद्राला लागून आहे. सागरी मंडळाच्या परवानगीने हा खडक फोडण्यात आला असून त्या ठिकाणी पावसाळयात लागणारी सुकी मासळी सुकवली जात आहे. या गावात मासळी खरेदी करण्यासाठी सकाळ संध्याकाळ खवय्यांची मोठी झुंबड उडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे वाहनतळाची मोठी समस्या या गावाला सतावत होती. एकाच वेळी 100 वाहने उभी राहू शकतील असे वाहनतळ उभारण्यात आले आहे. यापूर्वी मासळी विक्रेत्या काही बंद बाजार इमारतीत तर काही कोळीण रस्त्यावर मासेविक्री करीत होत्या. त्यामुळे सर्व सेवासुविधांयुक्त असे अद्ययावत 90 गाळयांचे मासळी व भाजी मार्केट बांधण्यात आले आहे. त्यामुळे या गावाच्या सीमेवर गेली अनेक वर्षे उघडयावर भरणारा मासळी बाजार आता पूर्णपणे बंदिस्त इमारतीत होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्मार्ट व्हिलेज व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गाव दत्तक योजनेची अंमलबजावणी आपल्याही शहरात व्हावी अशी इच्छा होती. त्यामुळे मच्छीमार बांधवांचे गाव असलेल्या दिवाळे गावाची यासाठी निवड करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे प्रंलबित असलेल्या सुविधा निर्माण केल्या जाणार आहे. नवी मुंबईतील सर्व गावे अशी नियोजित व्हावीत अशी अपेक्षा आहे.

-मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply