पनवेल : वार्ताहर
नवी मुंबई विमानतळबाधित पारगाव व डुंगी गावात पावसाचे पाणी जाऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली. या संदर्भात तहसीलदार विजय तळेकर यांनी पाहणी केली. विमानतळबाधित पारगाव ग्रामपंचायत हद्दीतील पारगाव व डुंगी गावात सन 2017-18पासून पावसाच्या पाण्याने पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. अनेक घरांमध्ये पाणी जाऊन नुकसान होत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत अलिबाग येथे झालेल्या बैठकीत सिडकोचे अधीक्षक अभियंता गोसावी, कार्यकारी अभिनेता गुजराती आणि सहाय्यक अभिनेता वसुले यांनी या वर्षी पारगाव व डुंगी गावात पाणी जाणार नाही. तशी उपाययोजना केली असल्याचे सांगितले होते, मात्र या वर्षाच्या पहिल्याच पावसात दोन्ही गावांत अनेक घरांमध्ये पाणी गेले. पाहणीदरम्यान, तहसीलदारांना गावांत पाणी शिरून नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. सिडकोने केलेली उपाययोजना अपयशी झाल्याचे दिसून येत असल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. या वेळी सरपंच नाईक, उपसरपंच निशा पाटील, मनोज दळवी, रत्नदीप पाटील, सुशिलकांत तारेकर व तलाठी श्यामा पवार, ग्रामविकास अधिकारी मोरेश्वर मोकल आदी उपस्थित होते.