Breaking News

गुढीपाडवा

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणारा हा दिवस गुढीपाडवा!  कोणत्याही शुभकार्याला  या दिवशी सुरूवात करावी. इतर दिवसांसारखे या दिवशी मुहूर्त बघण्याची गरज नसते.

वसंत ऋतुचं आगमन या दिवसापासून होतं. नव्या शालिवाहन संवत्सराला या दिवसापासून सुरूवात होते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी, नव्या वास्तूत गृहप्रवेश, व्यवसायाला प्रारंभ करतात. हिंदु समाजात आपापल्या घराच्या दारात गुढी उभारण्याची परंपरा आहे. गुढी हे विजयाचे, समृध्दीचे आणि सकारात्मकतेचे प्रतिक समजले जाते.

प्रभू रामचंद्र यांनी चौदा वर्षांचा वनवास संपवून रावणासारख्या बलाढ्य शत्रुचा आणि इतर राक्षसांचा पराभव केला व आजच्याच दिवशी अयोध्येला परतले. त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ अयोध्यावासियांनी आपापल्या दारात गुढया उभारून त्यांचे स्वागत केले होते.

 अशी उभारतात गुढी 

शुभशकुनाच्या या गुढीत एक स्वच्छ काठी, त्या काठीच्या टोकावर नवे वस्त्र (साडी, ब्लाउजपिस, रूमाल), गाठी, आंब्याची पानं, कडुलिंबाची पानं, झेंडुच्या फुलांची माळ, तांब्याच्या धातुचा लोटा अशा  वस्तुंनी ही गुढी सजवली जाते.

या गुढीच्या भवती रांगोळी आणि इतर सजावट केली जाते. गुढीकरता पाट मांडला जातो, गोड-धोडाचा नैवेद्य दाखविला जातो, निराजंन उदबत्ती लावून औक्षण केले जाते. संध्याकाळी सुर्यास्तापुर्वी हळदकुंकू, अक्षता वाहून गुढी उतरवली जाते. हिंदु बांधव एकमेकांना नविन वर्षाच्या म्हणजेच गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देतात.

चैत्र शुध्द प्रतिपदेचे अर्थात गुढीपाडव्याचे आरोग्याच्या दृष्टीनेदेखील महत्त्व आहे. या दिवशी मीठ, हिंग, ओवा, मिरी, साखर आणि कडुलिंबाच्या पानांना एकत्र करून गोळी तयार केली जाते आणि तीचे सेवन केले जाते. यामुळे पचन सुधारते, पित्ताचा नाश होतो, त्वेचेचे आरोग्य सुधारते. या गोळीचे आयुर्वेदात अतिशय महत्व सांगितले आहे. या दिवसांत कडुलिंबाची पानं अंघोळीच्या पाण्यामधे टाकून स्नान करणे चांगले मानले आहे.

पुराणात लिहुन ठेवल्यानुसार एका शालिवाहन नावाच्या कुंभार पुत्राने शकांचा पराभव करण्याकरता मातीचे सहा हजार पुतळे बनविले आणि त्यात प्राण फुंकले. यांच्या सहाय्याने शकांचा पराभव केला. शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना सुरू होण्याची परंपरा तेव्हांपासूनच सुरू झाली.

देवी पार्वतीचा आणि महादेवाचा विवाह पाडव्याच्याच दिवशी ठरला असल्याचीदेखील कथा आहे. पाडव्यापासून लग्नाच्या तयारीला सुरूवात झाली आणि तृतियेला त्यांचा विवाह संपन्न झाला. पाडव्याच्या दिवशी देवी पार्वतीची आदिशक्तीची पूजा करण्याचीदेखील प्रथा आहे. त्याला चैत्र नवरात्रदेखील म्हणतात.

विवाहानंतर देवी पार्वती महिन्याभराकरिता माहेरी येते. तिचा कौतुक सोहळा म्हणून हळदीकुंकू आयोजित केले जाते. देवी पार्वती अक्षयतृतियेला सासरी निघते.

बहिणाबाई चौधरी यांची अहिराणी भाषेतील गुढिपाडव्यावरची कविता फार लोकप्रिय आहे…

आतां उभारा रे गुढी, नव्या वरसाचं देनं सोडा मनांतली आढी, गेलसालीं गेली आढी आतां पाडवा पाडवा, तुम्ही येरांयेरांवरी लोभ वाढवा वाढवा.

या दिवशी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचंदेखील आयोजन केलं जातं. नववर्ष स्वागत यात्रांना गेल्या काही वर्षांमध्ये ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे.

-वैभव भारांबे

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply