पनवेल : वार्ताहर
वडघर ग्रामपंचायत हद्दीतील नामदेववाडी येथील जागा व राहती घरी सिडकोने पुनर्वसन योजनेंतर्गत संपादित केलेली आहे, पण तेथील रहिवाशांचा काही प्रश्न उरला आहे. या संदर्भात स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली त्या भागातील रहिवाशांनी भेटीस येऊन त्यांची समस्या मांडली आहे. या समस्येवर सिडकोशी चर्चा करून योग्य मार्ग काढू, असे आश्वासन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या शिष्टमंडळाला दिले.
नामदेववाडीत राहणारे नरेश म्हस्के, बाळाराम भोईर, जयश्री पाटोळे, निर्मला गायकवाड, विजू सांबर, कर्सन वाळू आदींसह इतरांची घरे सिडकोने संपादित करून निष्कासित केली आहेत. त्याबद्दल सिडको त्यांना विकसित प्लॉट देणार आहे, पण सहा महिने उलटून गेले तरी सिडकोने त्यांना विकसित भूखंड दिलेला नाही. त्यामुळे या कुटुंबांना अद्यापही भाड्याच्या घरात रहावे लागत आहे. ही सर्व जण गरीब कुटुंबातील असल्याने वाढत्या महागाईत त्यांना घर भाड्याचा खर्च परवडत नाही आहे. या संदर्भात त्यांनी महेश साळुंखे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली असता साळुंखे यांनी त्वरित माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासोबत बैठक आयोजित करून त्यांना या नागरिकांच्या समस्या सांगितल्या व यातून सकारात्मक मार्ग काढण्याची विनंती केली.
या सर्व बाबींची माहिती घेऊन लवकरच सिडको या संबंधित अधिकार्यांशी चर्चा करून हा प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिले येथील रहिवाशांनी त्यांचे आभार मानले आहेत.