सेमीफायनलचा मार्ग मोकळा
अॅडलेड : वृत्तसंस्था
टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने बुधवारी (दि. 2) बांगलादेशचा पाच धावांनी पराभव केला. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे टीम इंडियाचा पराभव निश्चित मानला जात होता, मात्र पाऊस थांबल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल करीत सामना फिरवला. त्यामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा झाला आहे.
भारताने 20 षटकांत 6 बाद 184 धावा केल्या. बांगलादेशला सामना जिंकण्यासाठी 185 धावा करायच्या होत्या. पावसामुळे डकवर्थ लुईसच्या नियमानुसार धावांचे लक्ष्य 16 षटकांत 151 करण्यात आले होते. भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 145 धावांवर रोखत संघाला विजय मिळवून दिला. अर्धशतक करून खेळत असलेल्या लिट्टन दास याला पावसानंतरच्या पहिल्याच षटकात केएल राहुलने थेट थ्रो करत धावबाद केले. त्यानंतर बांगलादेशचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.
तत्पूर्वी उपांत्य फेरीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला अपयश आले. या विश्वचषकात आतापर्यंत शांत असलेल्या केएल राहुलने या सामन्यात तुफान कामगिरी केली. त्याने तीन चौकार आणि चार षटकारांनिशी 32 चेंडूंत 50 धावा केल्या. त्याला विराट कोहली चांगली साथ मिळाली. विराटने विराटने 44 चेंडूंत 64 धावा ठोकल्या. यात आठ चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता. सुर्यकुमारने 30 धावांचे योगदान दिले.