यंदाचा गुढी पाडवा हा ‘नेहमीसारखे जगण्याचा उपक्रम’ सुरु करण्यासाठी अगदी आदर्श आहे. कारण गेली दोन वर्षे महाराष्ट्रासाठी एखाद्या काळरात्रीप्रमाणे गेली. दोन वर्षांपूर्वी अशाच एका गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला देशभर लॉकडाऊन करण्याची घोषणा झाली होती. त्यानंतरची दोन वर्षे भयानक संकटाला तोंड देण्यातच गेली. कुठल्याही निर्बंधांशिवाय गुढी पाडवा साजरा करण्याची संधी ही त्यानंतर आता मिळते आहे.
चैत्र महिन्याच्या पहिल्या तारखेला शालिवाहन शकातले नवे वर्ष सुरु होते. गेली शतकानुशतके महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी चैत्र शुध्द प्रतिपदा हाच नव वर्षाचा मुहूर्त मानला जातो आहे. उन्हाचा ताप वाढत असतो, तेव्हाच कोवळीलूस पालवी झाडांना फुटत असते. आंब्याच्या वनात मोहोराचा गंध उसळलेला असतो, आणि लहानमोठ्या कैर्यांनी झाड लडबडून जाते. रानावनात लालभडक पळस फुललेला असतो. या चैत्राच्या निसर्गातल्या खुणा. आपल्यासारख्या जनसामान्यांसाठी मात्र चैत्राच्या आगमनाची वर्दी भिंतीवरी सदानकदा लटकलेल्या कॅलेंडरातूनच मिळते. प्रभु श्रीरामांनी रावणाचा वध करुन अयोध्येत पुन्हा पाऊल ठेवले, तो हा दिवस, असेही सांगितले जाते. काहींच्या मते शककर्ता सम्राट शालिवाहन हा पैठणला पोहोचला, तेव्हा पैठणकरांनी गुढ्यातोरणे उभारुन त्याचे स्वागत केले, असाही दाखला दिला जातो. कुणाच्या मते गुढी म्हणजे ब्रह्मध्वज आहे तर कुणी म्हणते तो इंद्रध्वज मानावा. गुढी उभारण्याबद्दल खूप आख्यायिका आहेत. मानववंशशास्त्रानुसार, कृषि संस्कृतीतून उद्भवलेला हा सण आहे. गुढी पाडवा हा साडेतीन पवित्र मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी एखाद्या उपक्रमाचा प्रारंभ करण्याची परंपरा आहे. यंदा गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने उरलेसुरले निर्बंधही उठवले त्याचे स्वागत केले पाहिजे. यापुढे सार्वजनिक ठिकाणी वावरतानाही मास्क वापरण्याची सक्ती उरणार नाही. अर्थात ज्यांना अजूनही कोरोनाच्या लागणीचे भय वाटते, त्यांनी मास्क वापरायला हरकत नाही. मास्क ही बाब आता ऐच्छिक स्वरुपाची झाली आहे. तसेच सामाजिक अंतर पाळण्याचे सोवळे ओवळेही आता रद्दबातल झाले आहे. आपण सारे याच क्षणाची गेली दोन वर्षे वाट पाहात होतो. कोरोनाच्या दुसर्या लाटेशी झुंजताना आपल्या सर्वांचेच प्राण कंठाशी आले होते, तेव्हा युरोपात काही ठिकाणी मास्कमुक्ती लागू झाली होती. आजही अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड, स्वीडन आदी अनेक देशांमध्ये मास्क बंधनकारक उरलेला नाही. अनेक देशांमध्ये मास्क़च्या वापराविरोधात निदर्शनेही झाली. भारतात मात्र कोरोनाचे संपूर्ण उच्चाटन होण्याची वाट पाहिली गेली. निर्बंध हटले याचा अर्थ कोरोनाचा विषाणू आता नष्ट झाला आहे, असा मात्र कोणीही घेऊ नये. लॉकडाऊन, निर्बंध अशी पावले उचलली गेली, तेव्हा कोरोना विषाणूबद्दल कुणालाही धड माहिती नव्हती, आणि लसदेखील उपलब्ध नव्हती. आता अशा साथरोगाशी मुकाबला करण्याचे सामर्थ्य मानवजातीत आले आहे, एवढाच त्याचा अर्थ. गुढी पाडव्याच्या दिवशी नव्या संवत्सराचा प्रारंभ होतो. नवे संवत्सर हे बिघडलेले जीवनचक्र आणि अर्थचक्र सुरळीत करण्याच्या कामी खर्ची पडणार आहे, याचे भान सर्वांनी ठेवायला हवे. यंदाचा गुढी पाडवा आणि पाठोपाठ येणारा रामनवमीचा सण थाटामाटात साजरा करायलाच हवा, यात शंका नाही. पण गेल्या दोन वर्षातील महामारीत आपण अनेक आप्त गमावले, त्याचाही विसर पडायला नको. खबरदारी घेतच राहुया. गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!