महिलांची नगरपंचायतीवर धडक; जलवाहिनी टाकण्याचे आश्वासन
माणगाव : प्रतिनिधी
नगरपंचायतीच्या वार्ड क्र.11 मधील गजानन महाराज मंदिर परिसर व शेजारील गणेश नगरात पिण्याची पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, तेथील महिलांनी मंगळवारी (दि. 5) माणगाव नगरपंचायत कार्यालयाला धडक दिली. व पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. या वेळी मुख्याधिकारी यांनी 30 एप्रिल 2022पर्यंत जलवाहिनी टाकून गजानन महाराज मंदिर परिसर आणि गणेश नगरमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाईल असे लेखी आश्वासन दिले.
माणगाव नगरपंचायत हद्दीतील गणेश नगर आणि गजानन महाराज मंदिर परिसरातील नागरिकांना भीषण टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या येथील महिलांनी मंगळवारी नगरपंचायत कार्यालयात धाव घेतली. गेल्या दिड वर्षांपासून आम्हाला नळपाणी पुरवठा होत नसल्याचे सांगून त्याबद्दल जाब विचारला.
दरम्यान, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, पाणीपुरवठा सभापती राजेश मेहता, स्थानिक नगरसेवक कपिल गायकवाड यांनी या महिलांची कार्यालयात बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर नगराध्यक्ष पवार यांनी मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना धारेवर धरीत या ग्रामस्थांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कधी मार्गी लागणार, असा सवाल उपस्थित केला. या वेळी नवीन जलवाहिनी टाकून 30 एप्रिल 2022 पर्यंत गणेश नगर आणि गजानन महाराज मंदिर परिसरात सुरळीत पाणी पुरवठा करण्यात येईल, असे लेखी आश्वासन माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी दिले.