दुसर्या दिवशीही काम ठप्प
कर्जत : बातमीदार
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी महासंघाने प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपाचे हत्यार उगारले आहे. सोमवारपासून संपावर गेलेल्या कर्जत आणि खालापूर या दोन तालुक्यातील महसूल कर्मचार्यांनी मंगळवारी (दि. 5)
दुसर्या दिवशी कर्जतच्या उपविभागीय कार्यालयाबाहेर निदर्शने केली. या वेळी राज्य महसूल कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष हेमंत साळवी यांनी संपात सहभागी असलेल्या कर्मचार्यांशी संवाद साधला.
राज्यातील महसूल कर्मचारी आपल्या अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी विविध आंदोलने केल्यानंतर सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. कर्जत प्रांत अधिकारी आणि तहसील कार्यालयातील कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. महासंघाचे कर्जत तालुका अध्यक्ष रवी भारती, कार्याध्यक्ष गोवर्धन माने, उपाध्यक्ष संदीप गाढवे, रोहित बागुल, तसेच मिलिंद तिर्हेकर, नीता गोरेगावकर, दिनेश गोल्हार, आप्पा राठोड, तेजल उंबरे, रवी तोंडरोड, अक्षय जाधव, वैभव जाधव, राहुल सूर्यवंशी यांनी संपात सहभागी होत सलग दुसर्या दिवशी कोणतेही कामकाज केले नाही. संपकरी कर्मचार्यांनी कर्जत उपविभागीय अधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनेही केली.
संपाच्या दुसर्या दिवशी राज्य महसूल कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष हेमंत साळवी, कार्याध्यक्ष कुरणे यांनी कर्जत आणि खालापूर येथील संपात सहभागी झालेल्या कर्मचार्यांशी संवाद साधला.