Breaking News

रोहा शहरातील वाहतूक कोंडीचा तिढा कायम

रोहे : प्रतिनिधी

अरूंद रस्ते, वाहन तळांचा अभाव, बेशीस्त वाहन चालक, वाहनांची वाढलेली संख्या आणि दुकानदारांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण यामुळे रोहे शहरात कायम वाहतूक कोंडी होत असते. त्याचा त्रास पादचारी व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने रोहे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

तालुक्याचे मुख्यालय असल्याने शासनाच्या विविध कामांसाठी नागरिक रोहे शहरात येत असतात. शाळा, कॉलेजसाठी विद्यार्थी, बाजारहाटसाठी नागरिक, छोटे व्यावसायिक आणि मुरूडकडे जाणारे पर्यटक सातत्याने रोहा शहरात ये-जा करीत असतात. त्यामुळे शहरात कायम मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

शहरात प्रामुख्याने रोहा एसटी स्टँडसमोर वाहतूक कोंडी होत असते. या ठिकाणी काही व्यवसायिकांनी रस्ता ही ताब्यात घेतला आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. बाजारपेठेतील तीनबत्ती नाका ते राम मारुती चौक, राम मारुती चौक ते रोहा नगर परिषद कार्यालयापर्यंत सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. एसटी स्टॅण्डला बायपास असलेल्या रस्त्यावरही वाहतूक कोंडी होत असते.

कामानिमित्ताने रोहा शहरात आलेले नागरिक आपली वाहने बिनधास्तपणे कुठेही उभी करतात. शहरातील  काही रस्ते अरुंद आहेत. खरेदीसाठी आलेले ग्राहक आपल्या गाड्या बाजारपेठेत उभी करुन खरेदी करीत असल्याने वाहतूक कोंडी होत असते. काही ठिकाणी  उंचचउंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र त्यांना पार्किंग नसल्यांने त्या रहिवांशाच्या गाड्या रस्त्यावर उभ्या रहात आहेत. काही ठिकाणी इमारतींची बांधकामे चालू आहेत. तेथे रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकण्यात आल्यामुळे बाजारपेठेत वाहतूक कोंडी होत आहे.

पे अ‍ॅण्ड पार्क या संबधीत निविदा काढण्यात आली आहे. त्यानंतर नगर परिषद व पोलीस यंत्रणा संयुक्तरित्या वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी सध्या वाहतूक शाखेचे तीन पोलीस अंमलदार नेमले आहेत. नगर परिषद मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्याशी चर्चा करून बायपास मार्गे मुरूडला पर्यटक जाण्यासाठी दिशा फलक लावण्यात येणार आहेत. -संजय पाटील, पोलीस निरीक्षक, रोहा

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply