कोल्हापूर : प्रतिनिधी
मोहित कंबोज हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बुडवतील का, याची काळजी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी करू नये. पण संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेऊन बुडणार हे मात्र स्पष्ट दिसत आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (दि. 16) कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. चंद्रकांत पाटील म्हणाले की, संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले की, मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीस यांना बुडवतील. याची काळजी संजय राऊत यांनी करू नये. देवेंद्र फडणवीस आणि आम्ही समर्थ आहोत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘पे रोल’वर राहून पवार साहेबांचा अजेंडा चालविणारे संजय राऊत हे अंतिमतः वाट लावणार आहेत व आपल्याला खड्ड्यात घालणार आहेत, हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलेले दिसत नाही. त्यांनी सांगितले की, अडीच वर्षांपूर्वी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना युती तोडण्यासाठी भरीस घातले. भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केल्यानंतर शिवसेनेने मुस्लिम मतांच्या मागे लागून आपला मूळ पाया संपविला. यामुळे आपल्याला मानणारी जनता तसेच आपले जुने नेते- कार्यकर्ते सोबत राहणार नाहीत, हे उद्धवजींच्या लक्षात येत नाही. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याबाबत 19 बंगल्यांचा विषय एक वर्षापूर्वी मांडण्यात आला. या काळात संजय राऊत याविषयी बोलले नाहीत. संजय राऊत स्वतः किंवा त्यांचे सीए किंवा त्यांच्या मुलींपर्यंत विषय येत नव्हता तेव्हा त्यांच्यासाठी सर्व काही आलबेल होते. आता त्यांच्या गळ्याशी विषय आल्यानंतर त्यांनी शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण शिवसेना वापरण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील शिवसैनिकांची संख्या कमी पडली तर नाशिक व पुण्यातून शिवसैनिकांना आणले. ही पत्रकार परिषद शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावरील हल्ले परतविण्यासाठी होती तर आदित्य ठाकरे, सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे हे सेनेचे नेते का उपस्थित नव्हते, असा प्रश्न निर्माण होतो. ते म्हणाले की, संजय राऊत यांच्या पोकळ धमक्यांना भाजपा घाबरत नाही. भाजपाच्या विरोधकांनी हे ध्यानात घ्यावे की, हा नवा भाजपा आहे. देवेंद्रजींच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न शंभरजणांनी केला तर पाठिंब्यासाठी भाजपाचे एक हजार कार्यकर्ते पोहोचले. किरीट सोमय्या यांच्या हत्येचा प्रयत्न झाला तर त्यांच्या समर्थनासाठी हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. हल्ले कराल तर निराशेशिवाय काहीही हाती लागणार नाही.
‘कारवाईच्या भीतीने राऊतांचे बेताल आरोप’
मुंबई : आपले गैरव्यवहार उघडकीला येण्याची चिन्हे दिसू लागल्याने शिवसेना नेते संजय राऊत हे अस्वस्थ झाले असून या अस्वस्थतेमुळेच ते भाजप नेत्यांवर बेताल आरोप करू लागले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मध्यम, लघु व सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी (दि. 16) केले. भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री होण्याच्या महत्वाकांक्षेने पछाडलेल्या राऊत यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून हटविण्याची सुपारी घेतली आहे, असा आरोपही राणे यांनी या वेळी केला.