बारावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत खारघर येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला 100 टक्के यश मिळाले आहे. निकालाची ही परंपरा यावर्षीही शाळेने कायम राखली आहे. त्यामुळे या पब्लिक स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. लवकरच लागलेल्या निकालामुळे पुढील शिक्षणाच्या प्रवेशाच्या तयारीसाठी अन्य बोर्डांच्या तुलनेत विद्यार्थ्यांना अधिक वेळ मिळेल.
सीबीएसई बारावीच्या निकालांनी जणू निकालांच्या मौसमाची सुरूवात झाली असून प्रारंभीच निकालाच्या या बातम्यांमध्ये पनवेलचे नाव दिमाखाने झळकल्याने पनवेलकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. सीबीएसई बारावीच्या राज्य पातळीवरील निकालांमध्ये पहिल्या तीन क्रमांकांवर स्थान मिळवणार्या सहा विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी नवीन पनवेलमधील आहेत. अर्थातच ही बाब पनवेलकरांना सुखावणारी आहे. शशांक नागने 98.8 टक्के मिळवून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. सीबीएसईच्या या निकालांमध्ये यंदा लक्ष वेधून घेतले आहे ते 90 आणि 95 टक्क्यांच्या वर गुण मिळवणार्या मुलांनी. या बोर्डात बारावीत यंदा 95 टक्क्यांच्या वर गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 40 टक्क्यांनी वाढली आहे. एकूण 17 हजार 693 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले असून यात गेल्या वर्षीपेक्षा 4 हजार 956 विद्यार्थी अधिक आहेत. 90 ते 95 टक्के मिळवणारे विद्यार्थी 94 हजार 299 इतके असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 21 हजार 700 ने वाढली आहे. किती अचाट आहेत हे आकडे! देशभरातून 12 लाख 5 हजार 484 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून यापैकी 10 लाख 5 हजार 427 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचे प्रमाणही प्रत्येक वर्षागणिक वाढत चालले असून 2012 साली 500 पैकी 495 गुण सर्वाधिक होते तर यंदा हा आकडा 499 वर पोहोचला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्याही सातत्याने वाढतेच आहे. सीबीएसईच्या निकालांनी यंदा लक्ष वेधून घेण्याचे आणखी एक कारण म्हणजे अवघ्या 28 दिवसांत या बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. अर्थातच अन्य बोर्डांवर आता लवकर निकाल जाहीर करण्यासाठीचा दबाव निश्चितपणे वाढणार आहे. विशेषत: परदेशी शिक्षणाच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांना अधिक उत्तम तयारी करणे शक्य होणार आहे. उत्तरपत्रिका तपासणीसाठी जास्त शाळा केंद्रे नियुक्त करणे तसेच प्रत्येक केंद्रावरील शिक्षकांची संख्याही वाढवणे अशा उपाययोजनांमुळे सीबीएसईला निकाल लवकर जाहीर करणे शक्य झाले असून त्याचा कित्ता अन्य बोर्डांनी, विशेषत: राज्य बोर्डाने गिरवायला हरकत नाही. निकाल लवकर लागल्याने पुढील शैक्षणिक प्रवेशाच्या तयारीकरिता, शाखा निवडीच्या निर्णयाकरिता विद्यार्थ्यांना अधिक वेळ मिळतो व त्यांच्यावरील तसेच एकंदर व्यवस्थेवरील ताणही त्यामुळे दूर होतो. अर्थात सीबीएसईचे 90-95 टक्क्यांच्या पुढे गुण मिळवणारे विद्यार्थी वाढल्यामुळे विशेषत: बीएमएस, बीएमएम यांसारख्या व्यावसायिक कोर्सेसच्या प्रवेशासाठीची स्पर्धा अटीतटीची होणार आहे. निकाल बाकी असलेल्या अन्य बोर्डांचे विद्यार्थी यामुळे अर्थातच धास्तावले असतील. प्रवेशाच्या या स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांना समपातळीवर आणणे जरुरीचे असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. प्रत्येक बोर्डाची गुणदानाची पद्धत वेगळी असल्याने सीबीएसईच्या 95 टक्क्यांची तुलना अन्य बोर्डांशी करणे योग्य होणार नाही. वाढत्या स्पर्धेनुसार सर्वच बोर्डांना व एकंदर शिक्षणव्यवस्थेला साजेसे बदल करतच पुढे जावे लागेल.