दोन वर्षांच्या एकतर्फी तेजीनंतर भारतीय शेअर बाजार यावर्षी एकाच ठिकाणी थांबला असून दररोजची वधघट वाढली आहे. नव्याने आलेले गुंतवणूकदार त्यामुळे गोंधळले आहेत. शेअर बाजारात जोखीम ही असतेच, असे जे म्हटले जाते, त्याची प्रचीती येवू लागली आहे. अशावेळीकोणतीदक्षता घ्यावी, हे समजून घेतले पाहिजे.
तेजीच्या बाजारात प्रत्येकजण बाजीराव असतो. एप्रिल 2021 ते नोव्हेंबर 2021 भारतीय शेअरबाजार हा 26 टक्क्यांनी वाढला ज्यामध्ये ट्रेडर्स, गुंतवणूकदार नवशिके किंवा मुरलेले अशा सर्वांनीच पैसे कमावले. परंतु मागील सहा महिन्यांत भारतीय बाजार हा केवळ 1-1.5 टक्क्यांनीच वाढलेला दिसतोय आणि त्यामुळं अननुभवी ट्रेडर्स जे शेअरबाजारात आपली कारकीर्द बनवू पाहणारे आपले विचार बदलताना दिसत आहेत. मागील महिन्यांत बाजारात असलेली अनिश्चितता ही प्रामुख्यानं दोन गोष्टीमुळं आहे, एक म्हणजे महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी पुढील कांही महिन्यांत अमेरिकेची मध्यवर्ती फेडरल बँक ही व्याजदर वाढवणार असं जाहीर विधान आणि दुसरं म्हणजे रशिया-युक्रेन युद्ध.
आपण जाणतोच की अमेरिकेतील महागाई दर हा मागील 40 वर्षांच्या उच्चांकावर आहे आणि रशिया-युक्रेन युध्दामुळं कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमती महागाई भडकवताना दिसत आहेत. आता बहुतांशी फंड मॅनेजर्स ज्यांनी अशा प्रकारच्या समस्येचा सामना केलेला नाही, त्यांच्यासमोर हा कूटप्रश्न आहे की अशा महागाईच्या काळात ज्यामध्ये व्याजदर चढे राहू शकतात अशा परिस्थतीमध्ये काय निर्णय घ्यावयाचे ? जर फंड मॅनेजर्स संभ्रमात असतील तर तुमच्या आमच्या सारख्यांची काय कथा..
अशा परिस्थितीत अनेक लोक अनेक विचार घेऊन पुढं येतात की केलेली गुंतवणूक योग्य वेळेस काढून देखील घेणं गरजेचं आहे म्हणजे आता गुंतवणूक ही बाँड्स मध्ये करता आली असती किंवा नवनवी क्षेत्रं, नव्या कल्पना व नवे ऍसेट्स क्लास अजमावयास हवे. परंतु सर्वांत महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आपल्या अभ्यासावर ठाम असाल तर नक्कीच अशा परिस्थितीत गुंतवणूक काढून न घेता ठरवलेलं उद्दिष्ट पार पडल्यावरच त्यातून गुंतवणूक काढून घेणं जास्त हितावह ठरू शकतं.
या बाबतीत कांही मुद्दे नक्कीच मार्गदर्शक ठरतील –
- रास्त अपेक्षा ठेवणं – अनेक लोक याच विचारानं बाजारात येतात की शेअर मार्केट म्हणजे जादू आहे, इथं टाकलेले पैसे कमी अवधीत अनेकपट परतावा देतात. हीच हाव त्यांचा अपेक्षाभंग करते. उदाहरणार्थ 1999-2000 मध्ये सॉफ्टवेअर शेअर्सना प्रचंड मागणी होती. नुसते नांवात सॉफ्टवेअर असलं तरी त्या शेअर्सना मागणी असायची. तेंव्हा अनेक गुंतवणूकदार पाण्याची खोली विचारात न घेता या लाटेवर स्वार होऊन आपलं उखळ पांढरं करू लागले आणि जेंव्हा 2000 साली हा फुगा फुटला तेंव्हा अनेकांना पश्चात्तापास सामोरं जावं लागलं. हेच घडलं होतं हर्षद मेहताच्या वेळच्या तेजीमध्ये. या लाटेवर सर्वांत शेवटी स्वार झालेले, लाट फुटल्यावर गटांगळ्या खाणार हे माहीत असून लाट अवास्तव तेजीचा फुगा कधी फुटेल याचा नेम नसल्यानं प्रत्येकजण लालसेपोटी अशा तेजीत सहभागी झालेला दिसतो. मागील सहा महिन्यांत अगदी हेच अनुभवायला मिळतं. मार्च 2020 पासून आलेल्या अद्भुत तेजीचा भर 2022 मध्ये ओसरलेला दिसतोय आणि दरवर्षी 50 टक्क्यांपेक्षा जास्त अपेक्षा ठेऊन सहभागी झालेले गुंतवणूकदार (सटोडे) सध्या बोटं मोडताना दिसतात. म्हणूनच अवास्तव अपेक्षेनं वाढीव मूल्यांकन असलेले शेअर्स खरेदी करणं कधीही घातकीच ठरू शकतं.
- वाढीव पी/ई रेशयो असलेले शेअर्स टाळणं – कोणत्याही कंपनीच्या समभागामध्ये आपला पैसा गुंतवण्याआधी त्या कंपनीचा- त्याच्या मूल्याचा अभ्यास करणे गरजेचं असतं. याच अभ्यासाचा एक महत्वाचा निकष म्हणजे प्राईज-अर्निंग रेश्यो, ज्याला थोडक्यात किंमत-उत्पन्न प्रमाण म्हणतात. या किंमत-उत्पन्न प्रमाणबद्दल थोडक्यात सांगायचं तर, किंमत-उत्पन्न प्रमाण म्हणजे अशी किंमत आहे जी एखादा गुंतवणूकदार कोणत्याही कंपनीच्या 1 रुपया उत्पन्नासाठी देण्यास तयार असतो. उदा. टीसीएस कंपनीनं नुकत्याच जाहीर केलेल्या रिझल्ट्समध्ये आपलं सध्याच्या तिमाहीचं प्रति शेअर उत्पन्न हे 26.85 रु. जाहीर केलं, म्हणजेच वार्षिक 107.4 रु. गृहीत धरल्यास व कंपनीच्या शेअर्सची सध्याचा भाव रु. 3662 असल्यानं कंपनीचा पी/ई असेल 34.09. किंमत-उत्पन्न प्रमाण दोन कारणांसाठी वापरले जातात. एक म्हणजे, एकाच सेक्टर मधील समभागांची तुलना करणे, उदाहरणार्थ एकाच किंवा एकसारख्या उद्योगातील दोन समभाग. अशावेळी तुलनेनं कमी किंमत-उत्पन्न प्रमाण असलेला शेअर स्वस्त असेल आणि दोघांमध्ये तो चांगली गुंतवणूक ठरू शकतो. (वरील उदाहरणात एल अँड टी इन्फोटेक कंपनीचा पी/ई 50 आहे.) दुसरं म्हणजे, वेळेनुरुप समभाग किंवा निर्देशांकाची त्याच्याच भूतकाळाशी तुलना करणं. जर किंमत-उत्पन्न प्रमाण त्याच्या भूतकाळातील मूल्याच्या तुलनेत कमी असेल, तर ते संभाव्य खरेदीचे द्योतक ठरू शकेल.
- आपल्या उद्दिष्ट्यांस चिकटून राहणं – ज्याप्रमाणं आपण आपल्या केलेल्या गुंतवणुकीतून 20 टक्के, 40टक्के कमाईचं ठराविक उद्दिष्ट ठेवत असतो, त्याचप्रमाणं घेतलेल्या शेअर्सचे भाव घसरून ठराविक पातळीच्या खाली जाऊ लागले तरी आपण त्यातून बाहेर पडायचे का नाही हे आधीच ठरवलेलं असावं. ही पातळी शेअरच्या भावाबद्दल असो अथवा टक्केवारीमध्ये. उदा. जर अमूक एका शेअर मध्ये 1000 रु भावामध्ये खरेदी करून गुंतवणूक केलेली असल्यास आपली तग धरण्याची क्षमता टक्केवारीमध्ये 10-15% असावी अन्यथा त्या शेअरची तांत्रिकी विश्लेषणानुसार असलेली आधार पातळी मग ती 900 रुपयांवर असो अथवा 950.
- रोख रक्कम – पडत्या बाजारात तुलनेनं स्वस्त मूल्यांकनामध्ये खरेदीपूरक वातावरणात खरेदी करून तुलनेनं जास्त परतावा मिळवण्यासाठी आपल्या एकूण गुंतवणुकीच्या कांही प्रमाणात (20-25%) रोख रक्कम तरल स्वरूपात बाळगणं फायदेशीर ठरू शकतं.
- मालमत्ता वाटप (ऍसेट ऍलोकेशन) – आगाऊ योजिल्याप्रमाणं आपलं मालमत्ता वाटप हे सुनिश्चित असावं आणि पडत्या बाजारात संधी शोधण्यासाठी लागणारं जास्तीचं गुंतवणूक भांडवल हे तरल स्वरूपात जवळ असावं जे अशा परिस्थितीसाठी राखीव असावं. प्रत्येक गुंतवणूकदाराचं मालमत्ता वाटप त्यांच्या आयुष्यातील ध्येयांनुसार व जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार वेगवेगळं असू शकतं. यासाठी तज्ञ व अनुभवी आर्थिक सल्लागाराशी विचारविमर्श करूनच आपले निर्णय घ्यावे.
- अफवा – बाजारातील अफवांना बळी पडू नका, सकारात्मक अथवा नकारात्मक. तुम्ही केलेली गुंतवणूक तुमच्या केलेल्या ध्येय, उद्दिष्टांना समोर ठेऊन अभ्यासानं केलेली असल्यानं अगदी काही अघटीत न घडल्यास बाजारातील अफवांप्रमाणं त्यामध्ये बदल करू नका. तुम्ही केलेल्या क्षेत्राबद्दल सकारात्मक अफवा असल्यास हुरळून जाऊन आपलं मांडलेलं लक्ष्य चुकवू नका आणि ठरवल्याप्रमाणं नफा पदरात पडून घ्या.
- अचूक वेळ साधण्यात संधी दवडू नका – अनेक वेळेस बाजार खाली येत असताना तो अजून खाली येईल या अपेक्षेनं किंवा भितीनं इच्छित गुंतवणूक करण्याचं टाळून संधी दवडू नका. त्याचप्रमाणं बाजार ऊर्ध्व दिशेस जात असताना आपल्या उद्दिष्ट्यानुसार टप्प्याटप्प्यानं नफावसूली करत राहा आणि प्रदीर्घ मुदतीसाठी केलेली गुंतवणूक थोड्या नफ्यासाठी विकू नका.
- पद्धतशीर गुंतवणूक – बिकट परिस्थितीत बाजाराबाबत खात्री नसल्यास एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी बाजारातील प्रत्येक टप्प्यावर ठराविक रकमेची गुंतवणूक करा. एसआयपी मग ती कोणत्या स्कीममधील असो वा एखाद्या शेअरमधील.
- रुपयाचं मूल्य – एखाद्या परिस्थतीत रुपयाचं अवमूल्यन होत असल्यास त्याचा फायदा आयटी व औषधं निर्यातदार कंपन्यांना मिळत असतो त्यामुळं सरसकटपणे रुपयाचं अवमूल्यन होत आहे म्हणून धास्तावून अशा गुंतवणूकीतून बाहेर पडण्याचे निर्णय घाईनं घेऊ नका.
- महागाई सकारात्मकता – महागाईच्या काळात शेअरबाजाररातील परतावा कमी होऊ शकतो परंतु तेथून पुढील तेजीचा हाच काळ पायाभरणीचा समजून योग्य जोखीम-परतावा गुणोत्तर साधून प्रदीर्घ गुंतवणुकीवर भर द्या.
-प्रसाद भावे, अर्थप्रहर