Breaking News

पनवेलमध्ये जापनीज इन्सेफेलाइटिस लसीकरण कार्यक्रमाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 1 ते 15 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना जापनीज इन्सेफेलाइटिस लस अंगणवाडी, शासकीय, निमशासकीय, खासगी शाळांमध्ये तसेच शाळाबाह्य परिसरात मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 1) करण्यात आले.
पनवेल शहरातील लोकनेते दि.बा. पाटील विद्यालयात आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या लसीकरण कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास उपायुक्त वैभव विधाते, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक गीते, बाल संगोपन अधिकारी डॉ. गणेश नायर, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेहाना मुजावर, पशुवैद्यकीय अधिकारी भगवान गीते, पालिकेचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, पोलिओसारख्या असाध्य रोगाच्या लसीकरणाच्या माध्यमातून मुक्त होण्याच्या दिशेने प्रवास झाला आहे. त्यासाठी अभियान राबविण्यात आले. त्याच पद्धतीने जापनीज इन्सेफेलाइटिसचे लसीकरण करण्याकरिता जनजागृती करून अभियान राबवून यावर मात करता येईल.
उपायुक्त डॉ. वैभव विधाते म्हणाले, या आजारावर आजतागायत कोणताही निश्चित अथवा ठोस उपाय उपलब्ध नसल्याने हा आजार होऊ नये याकरिता शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मोफत लस उपलब्ध केली आहे. नागरिकांच्या दारापर्यंत शासन लस घेऊन आले आहे. नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा.
जापनीज इन्सेफेलाइटिस हा एक मेंदुज्वर आजाराचा प्रकार आहे. रायगड जिल्ह्यातही या आजाराचे रूग्ण आढळले आहेत. हा आजार डासांपासून पसरणार्‍या विषाणूचा प्रकार आहे, जो लहान मुलांकरिता जीवघेणा ठरू शकतो. यामध्ये 30% रुग्ण दगावले जाऊ शकतात, तर 40% रुग्णांना कायमचे अपंगत्व येऊ शकते.
जेई ही लस अत्यंत सुरक्षित असल्याकारणाने जागरूक पालकांनी आपल्या बालकांना या गंभीर आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पनवेल महापालिकेने नियोजित केलेल्या ठिकाणी आपल्या बालकाचे न चुकता लसीकरण करून घ्यावे व या मेंदुज्वराच्या, जेई आजारांपासून सुरक्षित राहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0चेही उद्घाटन

निरोगी बालपण व सुरक्षित भविष्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 अंतर्गत 0 ते 18 वर्षे वयोगटातील शाळा व अंगणवाडीतील मुला-मुलींची विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत जन्मजात आजार व इतर आजारांवर मोफत उपचार, संदर्भ सेवा व मोफत शस्त्रक्रिया करून मिळणार आहेत. या कार्यक्रमाचे शनिवारी उद्घाटनही करण्यात आले. यासाठी पाच टीम तयार करण्यात आल्या असून या टीमच्या माध्यमातून शाळा व अंगणवाडीमधील मुला-मुलींची विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply