डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या समाजकार्यामुळे महाराष्ट्राची शान वाढतेय -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्त
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या समाजकार्यामुळे महाराष्ट्राची शान वाढत आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 2) पनवेलमध्ये स्वच्छता अभियानावेळी केले.
ज्येष्ठ निरूपणकार, महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंत्तीनिमित्त पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगडभूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राज्यात स्वच्छता अभियानाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. पनवेलमध्येही हे अभियान राबवण्यात आले.
या अभियानात श्री सदस्यांनी फावडे, कुदळ, झाडूच्या सहाय्याने श्रमदान करीत आयटीआय, उपजिल्हा रुग्णालय तसेच खांदा कॉलनी आणि कामोठे परिसर स्वच्छ केला. पाच हजार 300हून अधिक श्री सदस्यांनी अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत स्वच्छता मोहीम यशस्वी केली. या अभियानाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि श्री सदस्यांच्या कार्याचे कौतुक केले.
स्वच्छता अभियानात कोन समिती विभाग अंतर्गत मोहोपाडा, शिवनगर, भोकरपाडा, भाताण, कोनसह 20 श्री समर्थ बैठकीतील तीन हजार 300 सदस्यांनी सहभाग घेतला. या वेळी साचलेला पालापाचोळा, टाकाऊ कचरा, प्लास्टिक एकत्रित करून पनवेल महापालिकेच्या वाहनांतून उचित विल्हेवाट लावण्यासाठी पाठवण्यात आला.
RamPrahar – The Panvel Daily Paper