Breaking News

सवणे खुटलवाडी येथे आदिवासींसाठी घरकुलांचे भूमिपूजन

आमदार महेश बालदी यांची वचनपूर्ती

पनवेल ः रामप्रहर वृत्त
विधानसभा निवडणुकीत उरण मतदारसंघातील एकही आदिवासी बांधव हा कुडाच्या घरात राहणार नाही हा दिलेला शब्द पूर्ण करणार, याचा पुनरूच्चार आमदार महेश बालदी यांनी खुटलवाडी येथे 137 घरकुलांच्या भूमिपूजनावेळी केला. त्याचप्रमाणे विकासकामासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असाही शब्द दिला.
पनवेल पंचायत समिती अंतर्गत प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान पीएम जनमन योजनेंतर्गत चावणे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासीवाड्यांमध्ये 137 घरकुले मंजुर झाली आहेत. यामध्ये सवणेवाडीत 21, खुटलवाडीत 54, पेरूचीवाडीत 52 आणि कालिवलीवाडीमध्ये 10 घरकुले उभारण्यात येणार आहेत. या सर्व घरकुलांचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 1) सवणे खुटलवाडी येथे करण्यात आले. एकही आदिवासी कुटुंब कुडाच्या कच्च्या घरात राहणार नाही, असे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी विधानसभा निवडणुकीत दिले होते. त्यानुसार त्यांच्या संकल्प कृतीचा पहिला टप्पा म्हणून घरकुलांची ही पायाभरणी करण्यात आली.
या वेळी आमदार महेश बालदी यांनी, आदिवासी कुटुंबाला पक्के घर असणे ही त्याची मूलभूत गरज आहे. प्रत्येक लाभार्थ्याने हे घर बनविताना विशेष लक्ष देऊन ते पूर्ण करावे. दोन महिन्यांच्या आत घरकुलाचे काम पूर्ण करणार असाल, तर वैयक्तिक 11 हजार रुपयांची प्रति लाभार्थी मदत दिली जाणार असल्याची घोषणा केली तसेच उपस्थित पदाधिकार्‍यांना आदिवासी बांधवांना घरकुल उभारण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना देत विकासकामसाठी पैशाची कमी कधीच भासणार नाही, असे स्पष्ट केले.
गेल्या दहा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला स्वतःचे घर असावे यासाठी पंतप्रधान आवास योजना प्रभावीपणे राबवली. अन्न, वस्त्र, निवारा या मानवी गरज आहेत आणि प्रत्येक देशवासीयांच्या डोक्यावर निवारा असावा अशा प्रकारची भूमिका केंद्र सरकारने घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनानेसुद्धा याकरिता सकारात्मक पाऊल टाकत मोठ्या प्रमाणात गोरगरीब, गरजूंसाठी घरे बांधली आहेत.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान आवास योजनेच्या दुसर्‍या टप्प्यामध्ये मंजुरी पत्र आणि पहिला हप्ता देण्यात आला. पनवेल, उरण परिसरामध्ये आजही मोठ्या प्रमाणात आदिवासीवाड्या आहेत. लवकरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टेकऑफ घेणार असताना या वाड्या-पाड्यांवरील घरे पक्की असावीत, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी विशेष प्रयत्न करीत आहेत.
भूमिपूजन समारंभास उपविभागीय अधिकारी पवन चांडक, प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, गटविकास अधिकारी समीर वाठारकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रदीप सोळसकर, विस्तार अधिकारी संतोष ठोंबरे, मिनल कनोजे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर घरत, भाजपचे केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, संदीप पाटील, संजय टेंबे, ग्रामपंचायत अधिकारी विजय नलावडे, रत्नाकर घरत, भगवान देशमुख, दिनेश पाटील, माजी सरपंच किरण माळी, विजय मुरकुटे, योगेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य ललिता दखडा, निरज देशमुख, सुरेश देशमुख, राघो वाघ, उमेश सरदार, अभिषेक साठे, हनुमंत साठे, मधू वाघ, मंगल्या पवार, राजा पवार, शंकर पवार, चंद्रकांत पवार, राजा सोतावळे, प्रकाश कातकरी, संकेत पाटील, विजय नलावडे, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आदिवासी बंधू-भगिनी उपस्थित होते.
दरम्यान, घरकुलांचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणारे भगवान देशमुख आणि रत्नाकर घरत यांचा या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply