अलिबाग : प्रतिनिधी
भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्यामुळे अलिबागच्या पांढर्या कांद्याच्या निर्यातीसाठी प्रयत्न सुरु झाले होते. मात्र यावर्षी उत्पादन कमी असल्याने अलिबागच्या पांढर्या कांद्याची निर्यात होऊ शकली नाही.
रायगड जिल्ह्यात खरीप हंगामात भात पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते मात्र रब्बी हंगामात सिंचन क्षेत्र वगळता फारशी पिकं घेतली जात नाहीत. रायगड जिल्ह्यात ओलिताखालील क्षेत्र फारसे नसल्याने दुबार आणि तिबार शेती जवळपास केली जात नाही. गेल्या काही वर्षात ही परिस्थिती बदलण्यास सुरवात झाली आहे. भात कापणी नंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकत असल्याने पांढराकांदा यासारख्या पिकांची लागवड करण्यास सुरुवात झाली आहे.
पांढर्या कांद्याचे उत्पादन अलिबाग तालुक्यातील प्रामुख्याने नेहुली, खंडाळे, कार्ले, तळवली या गावांमध्ये घेतले जाते. आलिबाग तालुक्यातील इतरही गावांमध्ये पांढर्या कांद्याची लागवड शेतकरी करू लागले आहेत.
या कांद्याला वाढती मागणी आणि चांगली किमंत मिळत असल्याने गेल्या काही वर्षात लगतच्या गावात पांढर्या कांद्याची लागवड केली जाऊ लागली. मागील वर्षी 230 हेक्टरवर पांढर्या कांद्याची लागवड करण्यात आली होती. यावर्षी पांढर्या कांद्याच्या लागवडीचे क्षेत्र काही प्रमाणात घटले आहे. यंदा केवळ अलिबाग तालुक्यात 227 हेक्टर क्षेत्रावर पांढर्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे. अवकाळी पावसाचाही काही प्रमाणात कांदा लागवडीवर परिणाम झाला आहे. रोप कुजल्याने लागवडी खालील क्षेत्र घटले आहे.
पांढर्या कांद्याचा आकार मोठा असल्याने कांद्याला चांगला दरही मिळत आहे. अगदी सुरवातीला 350 रुपये दराने कांद्याची माळ विकली गेली. बाजारात आवक वाढल्याने आता लहान कांदा 150 ते 200 रुपये माळ तर मोठा कांदा 250 ते 280 रुपये प्रती माळ दराने पांढरा कांदा विकला जात आहे.
रुचकर चव आणि औषधी गुणधर्म असलेल्या अलिबागच्या पांढर्या कांद्याला गेल्या वर्षी भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे या कांद्याला असणारी मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र यावर्षी उत्पादन वाढलेले नाही. त्यामुळे पांढर्या कांद्याची निर्यात मात्र होऊ शकली नाही. या कांद्याचे उत्पादन प्रामुख्याने सेंद्रीय पध्दतीने घेतले जाते. रासायनिक खतांचा आणि किटकनाशकांचा वापर केला जात नाही. भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्यामुळे अलिबागच्या पांढर्या कांद्याला आंतराष्ट्रीय बाजारात चांगली किंमत मिळू शकते. त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
कांद्याच्या निर्यातीसाठी प्रयत्न सुरु झाले आहे. त्यासाठी कृषीविभागा मार्फत शेतकर्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. यावर्षी उत्पादन कमी असल्याने निर्यात होऊ शकली नसली तरी पुढील वर्षी या कांद्याची निर्यात करण्याचे उद्दीष्ट असणार.
-दत्तात्रय काळभोर, कृषी उपसंचालक, अलिबाग, रायगड