Breaking News

अनंत कर्वे ः 55 वर्षे कंदील बनविणारा अवलिया

सेवा निवृत्तीचा काळ म्हणजे आराम, भटकंती. पण 74वर्षीय अनंत कर्वे यांनी स्वतःला आपल्या आयुष्यातील एका जुन्या छंदाने झपाटले आहे. टाकाऊपासून टिकाऊ आणि त्यातही आकर्षक वस्तू बनविणारे कर्वे यांना उतारवयात हा छंद वयाचे भान विसरायला लावतो. दरम्यान, या छंदातून त्यांनी हस्तकला आणि टिकाऊ वस्तूंचा खजिना उभा केला आहे.

39 वर्षे नोकरी करून सेवानिवृत्त झालेले नेरळ येथील अनंत कर्वे यांचे घर ज्येष्ठ नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि फावल्या वेळेत काय करायचे याचे उत्तम उदाहरण देणारे ठिकाण बनले आहे.वेळेचा योग्य उपयोग कसा करावा, हे कर्वे यांच्या छंदाने अधोरेखित होते. वेळेचा सदुपयोग करण्याचा निश्चयमणी बाळगलेल्या अनंत कर्वे यांनी आपली उपजत आवड निवृत्तीनंतर पुन्हा जिवंत केली.

स्वतःला स्वतःच्याच छंदामध्ये गुंतवून घेत कर्वे यांनी समाजाने ज्या वस्तूंना टाकाऊ म्हणून टाकले, त्यांना आपलेसे केले आणि आकर्षक वस्तूंची निर्मिती केली. त्याज्य वस्तू ज्या समाज रस्त्यावर किंवा कचराकुंडीत फेकून देतो, अशा वस्तूंना कर्वे यांच्या हाताचा स्पर्श झाला आणि आश्चर्याने तोंडात बोटे जातील, असे सुंदर टिकाऊ वस्तूंचे दालन उभे राहिले आहे, त्यामुळे त्यांचे ब्राह्मण आळीमधील घर टाकाऊ वस्तूंचे केंद्र बनले आहे.

अल्युमिनियमच्या तारा, सुकलेले गवत, शाडूची माती, झाडू आणि खराट्याच्या काड्या, आगपेटीच्या अर्धवट जळालेल्या काड्या, गोणपाट,  कागदाचा लगदा यांच्यापासून अनंत कर्वे आपला टाकाऊपासून टिकाऊचा छंद जोपासतात. या आपल्या छंदात शाडूच्या मातीपासून बनविलेल्या वस्तू या प्रामुख्याने विविध प्रकारच्या भाज्या बनविल्या आहेत. सर्व भाज्या हाताने घडविल्या असून कारले, तोंडले, वांगी, टोमॅटो, दुधी भोपळा, बटाटे, गाजर, काकडी, आलं, मिरची, लसूण अशा भाज्या बनविल्या आहेत. नंतर या सर्व भाज्यांना निसर्गरंग देण्याचे काम कर्वे करतात.कागदाच्या लगद्यापासून तोरण, लामण दिवे, समई आदी टिकाऊ वस्तू बनविल्या असून त्यांची उंची 10 इंचपासून दीड फुटापर्यंत आहे.

लग्नपत्रिका सर्व नदीत सोडून देतात, त्यांच्या पुठ्ठापासून अनंत कर्वे यांनी चपला जोड, बूट, मोजडी आदी वस्तू बनविल्या आहेत. त्याचवेळी पेपरच्या लगद्यापासून पाण्यात चिखलात बसलेली म्हैस, बगला, कावळा आदी पक्षीदेखील साकारले आहेत. त्यांनी जेवणाची पंगत देखील टाकाऊ म्हणून टाकलेल्या पुठ्ठापासून बनविली असून त्यात जेवणाचे पान बनविले असून पदार्थ हे फळ्यावर लिहिण्याच्या खडूपासून पाण्याचे लोटे यांची केलेली निर्मिती लक्ष वेधून घेते. तर केबल किंवा वायरमधील तांब्याच्या तारांपासून शस्त्रे घडविली आहेत. त्यात तलवार, खंजीर, भाले, कुर्‍हाड आदी वस्तू घडविल्या असून नववधूसाठी रुखवत देखील अनेक मुलींसाठी भेट दिलेल्या अनंत कर्वे यांनी छंद म्हणून जपलेल्या वस्तूंचे जतन केले आहे.

नेरळ येथील 74वर्षीय अनंत हरी कर्वे हे आपला छंद म्हणून गेली 55 वर्षे आकाश कंदील बनवून दिवाळी सणाला आपली घरी लावतात. पर्यावरण पूरक आकाश कंदील सर्वांनी घरी बनवून आपल्या दारी लावावा, या मताचे असल्याने कार्यशाळा आयोजित करण्यावर देखील त्यांचा भर राहिला आहे. दरम्यान, कलेची आवड असलेल्या कर्वे यांनी पर्यावरणस्नेही हस्तकलेची कला जोपासली आहे. अभियंता असलेले अनंत कर्वे हे 50हून अधिक वर्षे आकाश कंदील बनवत आहेत. पूर्वी वीज नसायची, त्या वेळी आकाश कंदीलमध्ये उजेड पडावा म्हणून पणती लावावी लागायची. पण त्या पणतीतील आगीमुळे आकाश कंदील पेटणार नाही, याची काळजी देखील घ्यावी लागायची म्हणून ते कंदील फिरणारे बनवायचे. काही वर्षांपूर्वी त्यांनी सध्या बंदी झालेल्या प्लास्टिक ग्लासपासून आकाश कंदील बनविले होते, त्यात चायना लाईट सोडून आकर्षक कंदील बनविले होते.तर पर्यावरणाला धोकादायक ठरलेल्या थर्माकोलपासून शंखासारखा दिसणारा कंदील बनला होता. तर प्रत्येक दिवाळीमध्ये आकाश कंदील किंवा चांदणी स्वतः बनवून आपल्या दारी लावावी, या मताचे असलेले अनंत कर्वे हे शाळांशाळांत आकाश कंदील आणि चांदणी बनविण्याच्या कार्यशाळा घेत असतात. त्यांनी नेरळमधील अनेक शाळेत अशा कार्यशाळा घेतल्या आहेत. यावर्षी त्यांनी बांबूच्या काठ्या आणि रंगीबेरंगी कागदापासून कंदील बनविला आहे.

-संतोष पेरणे

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply