Breaking News

चौथ्या लाटेची चाहूल?

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 2 हजार 541 केसेस नोंदल्या गेल्या आहेत, यापैकी 1 हजार 83 केसेस या एकट्या दिल्लीतील आहेत. कोरोना महासाथीशी संबंधित देशभरातील वाढती आकडेवारी सगळ्यांचीच चिंता वाढवणारी असून या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. गेल्या आठवड्यात देशभरात नोंदल्या गेलेल्या कोविड केसेसपैकी दोन तृतियांश केसेस या उत्तरेतील दिल्ली, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील आहेत. याच काळात महाराष्ट्रात केसेसमध्ये 48 टक्के, कर्नाटकात 71 टक्के, तामिळनाडूत 62 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 66 टक्के तर तेलंगणामध्ये 24 टक्के वाढ दिसून आली आहे. या आठवडाभरात देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 11 हजार 500 वरून 16 हजार 300 वर गेली आहे. गेल्या दोन आठवड्यांतील बदलती परिस्थिती लक्षात घेण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (27 तारखेला) सर्व मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा चर्चा करणार आहेत. गेले सलग तीन दिवस दिल्लीत रोज हजारापेक्षा अधिक कोरोना केसेसची नोंद झाली आहे. तेथील पॉझिटिव्हिटी रेट 4.48 टक्के असला तरी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची गरज भासणार्‍या रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. केंद्र सरकारने गेल्याच आठवड्यात महाराष्ट्रासह काही राज्यांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात मास्क वापरणे पुन्हा सक्तीचे झाल्यानंतरही महाराष्ट्रात मात्र मास्क वापराची पुन्हा सक्ती करण्याची गरज नसल्याचे राज्य सरकारकडून अलीकडेच सांगण्यात आले. गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी केले. परंतु नुकतीच मास्कमधून सुटका झालेली महाराष्ट्रातील जनता मास्क वापराकडे पुन्हा वळण्याच्या मन:स्थितीत दिसत नाही. राज्य सरकारने निव्वळ मास्क-सक्तीपोटी आकारला जाणारा दंड रद्द केला आहे. मास्क वापरू नये असे सरकारने म्हटलेले नाही असा युक्तिवादही आघाडी सरकारकडून करण्यात आला. परंतु हे असे म्हणणे युक्तिवादाकरिता सोयीचे असले तरी पुन्हा जनतेला कोरोना प्रतिबंधक खबरदारीकडे वळवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच आहे याचे भान ठाकरे सरकारने ठेवलेले बरे. निव्वळ खुर्च्या टिकवण्याकरिता कुरघोडीचे राजकारण करण्यात मश्गुल असलेल्या या तीन चाकी सरकारकडून या आघाडीवर दिरंगाई झाल्यास राज्यातील जनता पुन्हा महामारीच्या विळख्यात जाण्यास वेळ लागणार नाही. सध्याची केसेसची वाढती संख्या हा ओमायक्रॉनच्या नव्या विषाणूचा परिणाम आहे की दुसर्‍या डोसला बराच काळ लोटल्यामुळे लोकांची प्रतिकारशक्ती कमी पडू लागली आहे. याविषयी तज्ज्ञांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. तूर्तास कोरोना मृतांच्या संख्येमध्ये फारशी वाढ दिसत नाही ही एक दिलाशाची बाब आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर राज्यात तिसर्‍या (बूस्टर) डोससाठी जनतेमध्ये फारशी उत्सुकता दिसलेली नाही. पालघरमध्ये 100 टक्के तर मुंबईत 97 टक्के ज्येष्ठ नागरिकांनी लशीचा बूस्टर डोस घेतला आहे. रायगड जिल्ह्यात हे प्रमाण 94 टक्के इतके आहे तर ठाणे, जळगावमध्ये ते अनुक्रमे 93 व 92 टक्के आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र हे प्रमाण कमालीचे कमी आहे. एकंदरीत ढिसाळ कारभाराचीच सवय अंगवळणी पडलेल्या महाविकास आघाडी सरकारला यासंदर्भात वेळीच जाग आणण्यासाठी नेहमीप्रमाणे विरोधकांनाच प्रयत्न करावे लागतील असे दिसते.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply