पनवेल : बातमीदार
नवीन पनवेल येथील विसपुते बी.एड. महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये पाच सुवर्ण, 3 रौप्य व 2 कांस्य अशी 10 पदके पटकावली. या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरांवरून कौतुक केले जात आहे.
घणसोली येथे 8 व 9 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या बी.एड. रायगड जिल्हा क्रीडा स्पर्धेत बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशनने विविध क्रीडा प्रकारांमध्ये देदीप्यमान यश संपादन केले. आदर्श समूहाचे चेअरमन धनराज विसपुते यांच्या प्रेरणेने शैक्षणिक कार्याबरोबरच या महाविद्यालयाने क्रीडा क्षेत्रातदेखील आपली चोख कामगिरी बजावली. मुलींनी कबड्डीमध्ये प्रथम, खो-खोमध्ये द्वितीय, थ्रो-बॉल द्वितीय, गोळाफेक प्रथम व द्वितीय, थाळी फेकमध्ये प्रथम व तृतीय, भाला फेकमध्ये प्रथम, कॅरममध्ये प्रथम, रिलेमध्ये तृतीय अशा विविध क्रीडा प्रकारांत यश मिळवले. या कामगिरीबद्दल संस्थेचे चेअरमन धनराज विसपुते व संचालिका संगीता विसपुते यांनी प्राचार्य डॉ. सीमा कांबळे, सर्व स्टाफ व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.