खोपोली : प्रतिनधी
कर्जत-खालापूरचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी एका आंदोलनादरम्यान ‘भाजपच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही’, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याची खोपोली भारतीय जनता पक्षाने गंभीर नोंद घेत, निषेध व्यक्त केला आहे. शहर मध्यवर्ती कार्यालय भाजपच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार थोरवे यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्व उपस्थितांनी निषेध व्यक्त केला आहे. या वेळी आमदार महेंद्र थोरवे यांचा निषेध व्यक्त करताना, सन 2019 च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युती असताना आम्ही भाजपचे कार्यकर्ते थोरवे यांच्या विजयासाठी रस्त्यावर फिरलो होतो, यांची थोरवे यांनी जाण ठेवावी. आमदार थोरवे यांचे वक्तव्य मोगलाई किंवा हुकूमशाहीला शोभणारे आहे, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या पत्रकावर शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे व प्रमोद पिंगळे यांच्या स्वाक्षर्या आहेत.