Breaking News

कामगार दिनाचा इतिहास आणि कायदे

1 मे हा दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाचा आहे. या दिवसाला आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून जगभर मान्यता मिळाली आहे.

17 व्या शतकाच्या मध्यापासून सुरु झालेल्या औद्योगिक क्रांतीने युरोपमध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात झाली होती, पण त्याच बरोबर नवीन समस्या पण निर्माण झाल्या होत्या. त्यातलीच एक समस्या होती कामगारांची. औद्योगिक क्रांतीपासून कामगारांच्या शोषणाला, पिळवणूकीला सुरुवात झाली. त्यावेळी कामाची वेळी तब्बल 15 तासांची होती. कामगारांचं जीवन हलाखीचं होतं, त्यांना त्यांच्या मेहनतीच्या मोबदल्यात योग्य तो पगार मिळत नसे. कामगारांच्या अशा परिस्थितीतूनच पुढे जगाचा इतिहास बदलला.

कामगारांची पहिली मागणी होती आठ तासांच्या कामाची. पुढे ही चळवळ ‘एट आवर डे’ या नावाने ओळखली जाऊ लागली. ऑस्ट्रेलियामध्ये पहिली मोठी चळवळ उभी राहिली. दीर्घकालीन लढ्यानंतर ऑस्ट्रेलियन कामगारांना 21 एप्रिल 1856 रोजी त्यांचा हक्क मिळाला. तेव्हापासून ऑस्ट्रेलियामध्ये 21 एप्रिल हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.

ऑस्ट्रेलियामध्ये जे घडलं त्यापासून धडे घेत अमेरिकेतल्या कामगार संघटनांनी कामासाठी आठ तासांची मागणी केली. मागणी पाठोपाठ संप आणि मोठ्या प्रमाणात मोर्चे निघाले. शिकागोमधल्या आंदोलनात पोलिसांमुळे सहा आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने कामगारांच्या मनातला राग आणखीनच वाढला. याचा बदला घेण्यासाठी पोलिसांवर बॉम्ब फेकण्यात आले. सात पोलीस आणि चार नागरिकांचा यात मृत्यू झाला. याला जबाबदार म्हणून आठ लोकांना पकडण्यात आले. त्यांना फाशीची शिक्षा झाली. या फाशीने त्यावेळी जगभर संतापाची लाट उसळली होती. कारण असं म्हणतात की, या आठ जणांपैकी एकानेही बॉम्ब फेकला नव्हता.

या रक्तरंजित आंदोलनानंतर कामगारांचं आंदोलन यशस्वी झालं. योग्य पगार, चांगली वागणूक, पगारी सुट्टी आणि आठ तास काम या मागण्या मान्य झाल्या. तेव्हापासून अमेरिकेत हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला मे दिन असंही म्हटलं जातं.

प्रत्येक देशानुसार कामगार दिन हा वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो, पण बर्‍याच ठिकाणी 1 मे या दिवसाला मान्यता मिळाली आहे. खुद्द अमेरिकेत सप्टेंबरमधला एक दिवस  कामगार दिन म्हणून ठरवण्यात येणार होता. पुढे समाजवादी आणि कम्युनिस्ट पक्षांनी शिकागोच्या दुर्घटनेला श्रद्धांजली म्हणून 1 मे या दिवसाची निवड केली.

1904 साली अ‍ॅम्स्टरडॅम येथे झालेल्या सेकंड इंटरनॅशनल संघटनेच्या परिषदेत संपूर्ण जगातील कामगार संघटनांना हे आवाहन करण्यात आलं की, 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा करावा.

भारतात कामगार दिनाची पाळेमुळे 1923 सालापर्यंत मागे जातात. भारतातल्या ‘लेबर किसान पार्टी’ने 1 मे 1923 रोजी पहिल्यांदा कामगार दिन साजरा केला होता. याचवेळी कामगार दिनाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी भारतात पहिल्यांदाच लाल झेंडा वापरण्यात आला.

बालकामगार कायदा

ज्या लोकांकडे पुरेसे शिक्षण नाही किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, अशा लोकांना आयुष्यात भरपूर कष्टाची कामे करावी लागतात. जगण्यासाठी पुरेसा पैसे कमवणे याची चिंता करण्यात त्यांचे आयुष्य जाते. कामगार चळवळीनंतर कामगाराच्या हितासाठी प्रत्येक देशात काही कायदे करण्यात आले आहे. भारतात कामगारांना योग्य संरक्षण मिळावे यासाठी काही कायदे करण्यात आलेले आहेत. यात 200 राष्ट्रीय आणि 50 केंद्रिय कायद्यांचा समावेश आहे. भारतातील कामगार कायद्यांची व्याख्या एकसंध नाही. कारण सरकार स्थापना आणि भारतीय घटनेच्या समवर्ती यादीत कामगार हा एक विषय असल्यामुळे ते प्रत्येक राज्यात भिन्न आहेत. मात्र भारतात यासंदर्भात एक महत्त्वाचा कायदा नक्कीच करण्यात आले आहे. जो आहे दी चाईल्ड लेबर अ‍ॅक्ट ऑफ 1986 थोडक्यात बालकामगार कायदा. लहान मुलांच्या हितासाठी करण्यात आलेला हा कायदा आहे. बर्‍याचदा लहान वयातच कष्टाची कामे करावी लागल्यामुळे अनेक मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. या कायद्यानुसार भारतात चौदा वर्षांखाली बालकांना मजूरी अथवा काम करण्यास मनाई आहे. कामगारांच्या कामाची गुणवत्ता वाढवणे तसेच लहान मुलांचा मजूरीसाठी गैरवापर आणि छळवणूक टाळणे यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे.

आंतरराष्ट्रीय कामगार दिनाची थीम

जगभरात दररर्षी कामगार दिन साजरा करण्याबाबत एक खास थीम ठरवण्यात येते. 2016 साली यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार चळवळीचा उत्सव साजरा करणे ही थीम होती. 2017 साली कामगार दिनाची थीम होती, राष्ट्रीय वारशाचे जतन करणे. 2018 साली सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी कामगारांना एकत्र आणणे ही थीम राबवण्यात आली. 2019 ची थीम होती, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी कामगारांना एकत्र आणणे. 2020 साली कोरोना व्हायरस महामारीमुळे कामाच्या ठिकाणी संरक्षण आणि सुरक्षितता राखणे ही थीम ठेवण्यात आली होती. यंदादेखील जगभरात कोरोनाचे सावट पसरलेले आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी सुरक्षित राहून काम करणे हेच जीवनासाठी महत्त्वाचे आहे. 2021 साली आंतराष्ट्रीय कामगार दिनाची थीम होती, आताच कृती करा, बालमजुरी बंद करा. 2022 म्हणजेच यंदाची आंतराष्ट्रीय कामगार दिनाची थीम आहे, बालमजुरीविरूद्ध जनजागृती करणे आणि बालमजुरीचे प्रमाण कमी करण्यासाठी केल्या जाणार्‍या प्रयत्नांवर लक्ष केद्रिंत करणे.

साभार- बोभाटा, पीओपी

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply