Breaking News

खारेपाट पाणीपुरवठा योजनेचा आढावा

आ. रविशेठ पाटील यांच्याकडून पाहणी

पेण : प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी एमएमआरडीएच्या माध्यमातून 38 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देवूनही रखडलेल्या पेण तालुक्यातील वाशी, शिर्की खारेपाट पाणीपुरवठा योजनेची आमदार रविशेठ पाटील यांनी सोमवारी (दि. 9) प्रत्यक्ष पाहणी करुन या योजनेचा आढावा घेतला.

पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील वाशी, वाढाव, कणे, बोरझे, भाल, विठ्ठलवाडी, तुकारामवाडी, काळेश्री, शिर्की, बोरी, बेणेघाट आदी 27 गावे व वाड्यांना मागील अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येथील पाणीटंचाई निवारण्यासाठी हेटवणे धारण ते शहापाडा धरण व शहापाडा धरण ते वाशी, शिर्की खारेपाट विभाग अशा 18 किलोमीटर लांबीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी एमएमआरडीएच्या माध्यमातून 38 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला होता. मात्र या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात होऊनदेखील हे काम पूर्ण होऊ शकले नाही. 18 किलोमीटर लांबीच्या या योजनेपैकी 15 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून, तीन किलोमीटर लांबीचे काम अपूर्ण आहे.

या रखडलेल्या कामाबाबत आमदार रविशेठ पाटील यांनी सोमवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता पांडुरंग डोईफोडे आणि कामाचे कंत्राटदार यांच्यासह हेटवणे धरण ते बोरगावपर्यंत पाहणी केली. हेटवणे येथे उभारण्यात येणार्‍या पंपहाऊसचे काम अर्धवट असल्याने हे काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आमदार रवींद्र पाटील यांनी या वेळी दिल्या. आधारणे गावातील शेतकरी देविदास नाईक यांना 2012 पासून संपादीत जागेचे भूभाडे न मिळाल्याने त्यांनी याबाबत न्यायालयात दावा दाखल केला आहे. संबंधित शेतकर्‍याला तात्काळ भूभाडे देण्याचे

निर्देशदेखील आमदार पाटील यांनी यावेळी दिले. बोरगाव येथे  पाईपलाईनचे काम थांबलेले आहे, ते जास्तीच्या यंत्रणा लावून युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचनादेखील करण्यात आल्या. या वेळी युवा नेते  वैकुंठ पाटील, ललित पाटील, वढावच्या सरपंच पूजा पाटील, उपसरपंच ओमकार पाटील, बोरझेचे सरपंच मिलिंद पाटील, खारेपाट पंचक्रोशी चळवळीचे गणेश पाटील आदींसह खारेपाट विभागातील ग्रामस्थ उपस्थित होते.

या पाणीपुरवठा योजनेचे 15 किलोमीटर काम पूर्ण झाले आहे.उर्वरित कामदेखील लवकरच पूर्ण करण्यात येईल. हेटवणे धरण येथील पंपहाऊसचे काम गुरुवारपासून सुरू करण्यात येईल.

-पांडुरंग डोईफोडे, अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

Check Also

शेकाप माजी नगरसेवक सुनील बहिराचा भाचा रूपेश पगडेच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या

महिलांना जबरी मारहाण व दमदाटी भोवली पनवेल : रामप्रहर वृत्त बांधकाम मटेरियल सप्लायवरून वाद करीत …

Leave a Reply