Breaking News

‘मा.श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने रंगले

बिग शो मॅचमध्ये देवा थापाकडून नवीन चौहान चीतपट

पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कामोठ्यात शनिवारी (दि. 18)‘मा.श्री. परेश ठाकूर केसरी 2024’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने रंगले. या आखाड्यात नेपाळमधील पैलवान देवा थापा आणि हिमाचल प्रदेशमधील पैलवान नवीन चौहान यांची बिग शो मॅच आकर्षण ठरली. यामध्ये देवा थापा याने नवीन चौहानला चीतपट करून बाजी मारली.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सचिव हिंदकेसरी पैलवान योगेश दोडके यांच्या हस्ते झाले. या वेळी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे तसेच भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, उपाध्यक्ष के. के. म्हात्रे, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम पाटील, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक दिलीप पाटील, डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, तेजस कांडपिळे, गोपीनाथ भगत, माजी नगरसेविका हेमलता गोवारी, शिला भगत, कुसूम म्हात्रे, अरुणा भगत, पुष्पा कुत्तरवडे, युवा नेते हॅप्पी सिंग, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर यांच्यासह इतर पदाधिकारी, तालुका कुस्तीगीर असोसिएशनचे सदस्य आणि मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, कुस्तीगीर पैलवान नुसता ताकदवान असून चालत नाही, तर त्याच्याबरोबर अंगात चपळता असली पाहिजे. डावपेच टाकण्याची पद्धतही महत्त्वाची असते. यातून खर्‍या अर्थाने आपले जीवन घडवण्याचे काम कुस्तीगीरांमधून होत आहे. त्यांनी पुढे म्हटले की, काही वर्षांपूर्वी येथे मोठ मोठ्या कुस्त्यांचे सामने भरवले जात होते. कोरोनानंतर ते बंद झाले. परेश ठाकूर हे खेळामध्ये नेहमीच रस घेत असतात. त्यामुळे त्यांनी कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कुस्तीचे सामने आयोजित करण्याचा निर्णय घेतला. यातून कुस्तीपटूंना अपेक्षेपेक्षा जास्त प्रोत्साहन मिळालेले दिसत आहे. हिंदकेसरी योगेश दोडके हे राज्य कुस्ती असोसिएशनचे सचिव आहेत. त्यांनी परेश ठाकूर यांची आज रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड जाहीर केली आहे. त्यामुळे मला खात्री आहे की, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली परेश ठाकूर आपल्या जिल्ह्यात कुस्तीला चालना देतील. पनवेल तालुक्यात कुस्तीचा आखाडा होणे गरजेचे आहे. गव्हाण ग्रामपंचायतीत आम्ही सिडकोकडे 20 हजार मीटरचा प्लॉट मागितला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येणार आहे, त्याच्या बाजूला एक एकर जागा कुस्तीचा आखाडा बनवण्यासाठी घेण्याचा आमचा मानस आहे. सिडकोच्या परवानगीसाठी वेळ लागेल, पण मनामध्ये आलंय त्यामुळे ते पूर्ण केले जाईल, असे सांगून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी परेश ठाकूर यांच्यावरील प्रेमामुळे उपस्थित राहिलेल्या सगळ्यांचे आभार मानून भावी काळात कुस्तीगीरांनी स्पर्धेत अधिक जोमाने भाग घ्यावा, असे आवाहन केले व परेश ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आमदार निरंजन डावखरे यांनी परेश ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त मातीतील कुस्ती आयोजित केल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन केले. ते म्हणाले, आपल्या मातीबरोबर जोडून ठेवण्यासाठी या पद्धतीचे खेळ आवश्यक आहेत. हल्ली आपण पाहतो की कबड्डी, कुस्ती मॅटवरच खेळ जास्त होतात. अशा वेळी मातीतील कुस्तीचा खर्‍या अर्थाने आनंद आपल्या इथे पहायला मिळत आहे. यातूनच परेशशेठ यांची नाळ येथील मातीशी जुळल्याचे दिसून येते.
नेपाळमधील पैलवान देवा थापा यांनी म्हटले की, परेश ठाकूर यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी अनेक ठिकाणी गेलो, पण पनवेकरांसारखे प्रेम मला कोठेच मिळाले नाही. मला आपण बोलवल्याबद्दल धन्यवाद!
गिरवले (ता. पनवेल) येथील पैलवान प्रतिक हातमोडे यांनी सांगितले की, या सामन्यांचे आयोजन चांगले आहे. विशेष म्हणजे बक्षिसाची रक्कमही चांगली आहे. कुस्तीत वन मन शो असतो. मनापासून आवड असेल तरच या खेळात येणे चांगले, कारण यामध्ये खाणे-पिणे व्यवस्थित लागते. पनवेल भागात आखाडा तयार झाला, तर निश्चितच त्याचा फायदा आमच्यासारख्या कुस्तीपटूंना होईल.
* गदा जिंकणारे कुस्तीपटू
अमेघा अरुण घरत, खोपटे-उरण
वैष्णवी दिलीप पाटील, कल्याण
सौरभ पाटील, सीकेटी-पनवेल

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply