Breaking News

नेमबाजांची कमाल; टोकियो ऑलिम्पिकमध्ये 15 जागा निश्चित

दोहा : वृत्तसंस्था

दोहा येथे सुरू असलेल्या 14व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत अंगद वीर सिंह बाजवा आणि मायराज अहमद खान यांनी स्किट प्रकारात अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई केली, तर ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर याने पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदक मिळवले. नेमबाजांनी केलेल्या या अप्रतिम कामगिरीमुळे भारताने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत तब्बल 15 जागा निश्चित केल्या.

भारताच्या तीन जणांनी रविवारी ऑलिम्पिकमध्ये स्थान निश्चित केल्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा संघ सहभागी होईल. याआधी 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताच्या 11, तर 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये 12 नेमबाजांनी प्रतिनिधित्व केले होते.

23 वर्षीय बाजवा आणि 44 वर्षीय मायराज यांनी अंतिम फेरीत प्रत्येकी 56 गुणांची कमाई करीत अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर झालेल्या ‘शूट-ऑफ’मध्ये अंगद सरस ठरला. कुवेतच्या हबिब सौद याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

मनू भाकर आणि अभिषेक वर्मा यांनी भारताच्याच सौरभ चौधरी आणि यशस्विनी सिंह देस्वाल यांचा 16-10 असा पाडाव करीत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याचबरोबर कनिष्ठ एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात ईशा सिंह आणि सरबज्योत सिंह यांनी कोरियाच्या मिनसेओ किम आणि युनहो संग यांच्यावर 16-10 अशी मात करीत सुवर्णपदक पटकाविले.

मध्य प्रदेशच्या खारगोन जिल्ह्यातील रतनपूर गावात राहणार्‍या 18 वर्षीय ऐश्वर्य याने आठ जणांच्या अंतिम फेरीत 449.1 गुणांची कमाई करीत तिसरे स्थान पटकावले. कोरियाच्या किम जोंगह्यून याने 459.9 गुणांसह सुवर्ण, तर चीनच्या झोंगघाओ झाओ याने 459.1 गुणांसह रौप्यपदकावर नाव कोरले. रायफल थ्री पोझिशन प्रकारात ऑलिम्पिकचे स्थान मिळवणारा ऐश्वर्य हा संजीव राजपूत याच्यानंतरचा भारताचा दुसरा नेमबाज ठरला आहे. सुमा शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली ऐश्वर्य सध्या सराव करीत आहे.

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply