Breaking News

निर्सगातूनच भूस्खलनाच्या धोक्याची पूर्वसूचना मिळते

डॉ. हिमांशू कुलकर्णी यांचे पाणी परिषद चर्चेदरम्यान प्रतिपादन

पोलादपूर : प्रतिनिधी

कुपनलिकेचा हॅण्डपंप, जमिनीतील जलस्त्रोत, पावसाचा जोर आणि पाळीव प्राण्यांचे वर्तन अशा काही बाबींमधून भूस्खलनाच्या धोक्याची नैसर्गिक पूर्वसूचना मिळू शकते. संभाव्य दरडप्रवण क्षेत्र ओळखून त्याठिकाणी पूर्व चेतावणी प्रणाली विकसित करावी लागेल, असे मत डॉ. हिमांशू कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

माणगाव तालुक्यातील वडघर येथील साने गुरूजी स्मारकामध्ये भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. हिमांशू कुलकर्णी आणि अ‍ॅक्वाडॅम संस्थेतील त्यांचे सहकारी भूस्खलनाबाबत अहवालाची मांडणी करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन या निमंत्रक म्हणून उपस्थित होत्या.  प्रारंभी उमा आसलेकर यांनी प्रेझेंटेशननुसार माहिती दिली. याप्रसंगी महाडचे नायब तहसिलदार हे एकमेव शासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी डॉ. हिमांशू कुलकर्णी म्हणाले, नदीपात्रातील नैसर्गिक अडथळे म्हणजे जुट्टे तयार होण्यासाठी शेकडो वर्षांचा कालावधी लागत असून असे जुट्टेे काढल्याने पुराचा वेग तीव्र होऊन मानवी वस्तीमध्ये पुराच्या वेगवान पाण्याचा शिरकाव होऊन परिस्थिती नियंत्रणाबाहेर जावू शकते. यामुळेच कदाचित सीआरझेडकडून जुट्टेे काढण्याची परवानगी सद्यस्थितीत मिळत नसल्याची शक्यता आहे, असे सांगून पूर्व चेतावणी प्रणाली विकसित करण्याकामी अ‍ॅॅक्वाडॅम संस्थेने युनिसेफच्या मुंबई कार्यालयाच्या मदतीने महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये तीन महिन्यांत जलद अभ्यासाची प्रक्रिया राबविली आहे. यात पुणे जिल्ह्यातील वेल्हे व भोर, सातारा जिल्ह्यातील पाटण व महाबळेश्वर आणि रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर तालुक्यांचा समावेश होता. 2021मध्ये कोसळलेल्या 500 दरडींच्या ठिकाणी भेट देऊन 85 दरडींची दरड कोसळण्याच्या कारणांची मिमांसा करण्यासाठी निवड करण्यात आली, असे स्पष्ट केले. याअनुषंगाने जी माहिती समोर आली ती अहवालाद्वारे शासनासमोर मांडण्यात आल्याचे डॉ.कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.

या वेळी महाडचे मिलींद माने यांनी, प्रशासनाकडून केल्या जाणार्‍या हलगर्जीपणाबाबत अहवालामध्ये कोण उल्लेख असल्यास त्याबाबत माहिती द्यावी. पावसाचे पाणी नियंत्रित करता येणार नसेल तर अहवाल किती उपयुक्त असा सवाल केला. यावेळी पोलादपूर तालुक्यात यंदा ’दरडी कोसळू द्या आमच्या गावात’ अशा भुमिकेतून काही कडून माती उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे शैलेश पालकर यांनी सांगितले. या वेळी महाड येथील डॉ.जोगळेकर, विकास सौंदगीकर, गणेश खातू, निलेश पवार तसेच अन्य नागरिक उपस्थित होते.

पाणी परिषदेत दबाव आणला गेला : उल्का महाजन

सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी चर्चेदरम्यान उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तरे देताना महाड येथे झालेल्या पाणी परिषदेवेळी वाळू उत्खनन, पाणी साचण्याच्या ठिकाणी झालेली बांधकामे, भराव करणारे विकासक, नदीपात्रालगतच्या जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होण्यास कारणीभूत अशा क्षेत्रांतील काहींनी त्यांचा विषय पाणी परिषदेमध्ये न मांडण्यासाठी दबाव आला होता, असा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी केला.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply