Breaking News

नमो चषक स्पर्धेत खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याला वाव

प्रसिद्ध धावपटू ललिता बाबर यांची भेट व शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने उलवे नोडमध्ये सुरू असलेला भव्य क्रीडा महोत्सव नमो चषक 2025 स्पर्धेला दिवसेंदिवस खेळाडू आणि क्रीडारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दरम्यान, या स्पर्धेला अर्जुन पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर यांनी शुक्रवारी (दि. 24) भेट देत शुभेच्छा दिल्या. क्रीडाप्रेमी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे स्वागत व सन्मान केला.
लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत होत असलेल्या या नमो चषक क्रीडा महोत्सवात खेळाडूंची विशेष काळजी घेण्यात आली आहे. नाश्ता, भोजन, प्रवास, प्राथमिक उपचार, आसन व्यवस्था, मदत कक्ष व इतर सुविधाही त्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या क्रीडा महोत्सवात राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा, खो-खो, कबड्डी तसेच धावणे, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक, कीड व्हेलीन थ्रो, हातोडाफेक या अ‍ॅथलेटीक्स स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सात हजारपेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग लाभला आहे.
23 जानेवारीला राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा प्रकाशझोतात मोठ्या उत्साहात पार पडली. 24 जानेवारीला प्रकाशझोतात कबड्डी स्पर्धेचे नियोजन होते, तर 25 जानेवारीला खो-खो स्पर्धाही प्रकाशझोतात होणार आहे. याशिवाय धावणे, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक, कीड व्हेलीन थ्रो, हातोडाफेक या अ‍ॅथलेटीक्स स्पर्धा तीनही दिवस म्हणजेच 25 जानेवारीपर्यंत दिवसा होणार आहेत. एकूण तब्बल 14 लाख 91 हजार 200 रुपयांची रक्कम आणि चषक अशा प्रकारे पारितोषिकांचे स्वरूप आहे. स्पर्धा संपन्न झाल्यावर त्या त्या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना बक्षिसे देऊन गौरविले जात आहे.
नमो चषकामुळे खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याला वाव मिळण्यास मोठी मदत झाली असून खेळाडू आणि क्रीडाप्रेमी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, मुख्य आयोजक परेश ठाकूर आणि सहकार्‍यांना धन्यवाद देत आहेत.
स्पर्धेस्थळी दर्जेदार आयोजनाबरोबरच उत्तम प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे. युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी या ठिकाणी देशातील नामांकित क्रीडापटूंचे बॅनर लावण्यात आले असून त्यावर त्यांची प्रेरणादायी माहितीही नमूद करण्यात आली आहे. मैदानात विविध क्रीडा प्रकारात अनेक सामने रोमहर्षक पहायला मिळत असून त्याचा क्रीडारसिक मनमुराद आनंद घेत आहेत.
प्रसिद्ध धावपटू ललिता बाबर यांनी स्पर्धेच्या भव्य आणि दर्जेदार आयोजनाचे कौतुक करून खेळाडूंना प्रोत्साहन व शुभेच्छा दिल्या. त्यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. बाबर यांच्या या भेटीने खेळाडूंमध्ये स्फूर्तीचे वातावरण निर्माण झाले. याबद्दल क्रीडाप्रेमी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आनंद व्यक्त केला. या वेळी ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, स्पर्धा समन्वयक मयुरेश नेतकर, कबड्डी प्रशिक्षक शरद कदम, स्वप्नील ठाकूर, दिनेश खानावकर, देवांशू प्रभाळे, सुधीर ठाकूर, धीरज उलवेकर, शुभ पाटील यांच्यासह पदाधिकारी, आयोजन कमिटी सदस्य आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply