महाड वन विभागाची कारवाई; दोघांवर गुन्हा दाखल
महाड : प्रतिनिधी
बेकायदेशीर वृक्षतोड करुन लाकडाची अनधिकृत वाहतूक करणारी गाडी महाड वन विभागाने ताब्यात घेतली असून या प्रकरणी वाहतूक करणारा ट्रक आणि लाकडे जप्त करण्यात आली आहेत. गुप्त माहितीनुसार आकेशिया जातीची वृक्षाची विनापरवाना तोड करून अनधिकृतपणे वाहतूक करणारा ट्रक (केए-56, 0622) वन विभागाच्या पथकाने 29 एप्रिल रोजी रात्री 11 वाजता पोलादपूर नाका येथे ताब्यात घेतला. त्यात सुमारे 50 हजार 490 रुपये किमतीचे आकेशिया लाकडाचे 54 नग आढळून आले. हा ट्रक वन विभागाने ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी मोहम्मद झाकीउद्दिन मोहम्मद हुसैन (रा. त्रिपुरानाथ), हवप्पा उर्फ अविनाश चिंचोळीकर (रा. त्रिपुरानाथ) यांच्यावर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41, (2)(ब) 42, मुंबई वन अधिनियम 1942 चे कलम 66चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.