शासनाच्या टँकरला मंजुरी नाही; ‘जीवनज्योती‘कडून समस्या निवारण्याचा प्रयत्न
कर्जत : बातमीदार
तालुक्यातील आदिवासी भागाला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. आदिवासी भागातील महिलांना काही किलोमीटर अंतर जाऊन डोक्यावरून पाण्याचे हांडे आणावे लागत आहेत. दरम्यान, कर्जत पंचायत समितीकडून सरकारी नियम पुढे केले जात आहेत आणि त्यामुळे आदिवासी लोकांच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी जीवनज्योत सामाजिक संस्था सरसावली असून या संस्थेने पाण्याचे टँकर सुरू केले आहेत. पाच आदिवासी वाड्या आणि एक आश्रम येथे या संस्थेकडून टँकरने पाणी पोहचवले जात आहे. उन्हाळा सुरू झाला की, कर्जत तालुक्याच्या अर्ध्या भागात पाणीटंचाईची स्थिती निर्माण होते. पाणीटंचाई आराखड्यानुसार कर्जत तालुक्यातील 58 आदिवासी वाड्या आणि 23 गावांमध्ये पाणीटंचाई आहे. तेथे पाणीपुरवठा करण्याबाबतचा प्रस्ताव जानेवारी महिन्यात शासनाकडे पाठविण्यात आला आहे. प्रत्यक्षात मार्च अखेरपासून कर्जत तालुक्याच्या दुर्गम भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे अनेक आदिवासी वाड्यांमधील महिलांना काही किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावे लागत असल्याचे तेथील ग्रामस्थांनी कर्जत पंचायत समिती कार्यालयात जाऊन सांगितले. पुर्वी कर्जत पंचायत समितीमध्ये लोकनियुक्त पदाधिकारी असताना तालुक्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या लोकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सभापती- उपसभापती असायचे आणि तात्काळ टंचाईग्रस्त भागाला ट्रॅकरने पाणीपुरवठा सुरू व्हायचा. मात्र सध्या पंचायत समितीवर प्रशासक असल्याने तालुक्याच्या आदिवासी आणि ग्रामीण भागातून आलेल्या ग्रामस्थांची दाद, फिर्याद घ्यायला कोणी नाही. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल सुरू आहेत. कर्जत तालुक्यातील शिलार, ताडवाडी, मोरेवाडी, सुतारवाडी, बनाचीवाडीमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या आदिवासी लोकांनी कर्जत पंचायत समितीकडे टँकरची मागणी केली, मात्र पंचायत समितीने कागदपत्रांची ढाल पुढे करीत पाणीटंचाई नाही, असे ठरवून ट्रँकरने पाणीपुरवठा करण्यास नकार दिला आहे. शेवटी कळंब ग्रामपंचायतीमधील सुतारपाडा, सुतारवाडी तसेच पाथरज ग्रामपंचायतीमधील ताडवाडी, मोरेवाडी, शिलार येथील आदिवासी लोकांनी सामाजिक संघटनांकडे पाण्याच्या टंचाईची कैफियत मांडली, जीवनज्योत सामाजिक संस्थेकडे धाव घेतली. या संघटनेचे अध्यक्ष कांबळे आणि सचिव राजेश गायकवाड यांनी टंचाईग्रस्त वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केला आहे. पाणीटंचाई निर्माण झालेल्या ताडवाडी, मोरेवाडी, शिलार आणि शिलार येथील प्रेमकुटीर वृद्धाश्रम येथे आता दर दोन दिवसाने जीवनज्योत सामाजिक संस्थेकडून पाण्याचा टँकर पोहचणार आहे. तालुक्यातील बनाची वाडी आणि कळंब सुतारपाडा येथे देखील पाण्याचे टँकर पोहचले आहेत.
कोणत्याही पाणीटंचाईग्रस्त वाडी आणि गावातून आमच्याकडे प्रस्ताव आलेले नाहीत, मात्र स्वयंसेवी संस्था पाणी वितरण करीत असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ पाणीपुरवठा विभागाला त्या सर्व वाड्यांमध्ये जाण्याची सूचना करण्यात आली आहे. तेथील अहवाल आल्यानंतर आम्ही ग्रामसेवकांकडून पाणीपुरवठ्याबाबतचा प्रस्ताव बनवून घेऊ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून देऊ. जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी आल्यानंतर आम्ही टंचाईग्रस्त गावांना टँकर सुरू करण्याची कार्यवाही करू.
-चंद्रकांत साबळे, गटविकास अधिकारी, कर्जत पंचायत समिती
आम्ही अनेक वर्षे पाणीटंचाई भागात पाणी पुरविण्याचे काम करीत आहोत. ग्रामस्थांच्या मागणीनुसार 26 मार्चपासून संस्थेने कर्जत तालुक्यात टँकर सुरू केले आहेत.
-राजेश गायकवाड, सचिव, जीवनज्योत सामाजिक संस्था
RamPrahar – The Panvel Daily Paper