Breaking News

बाजार सारखा पडतोच आहे, आता काय करणार?

शेअर बाजारात गेल्या दोन वर्षांत आलेल्या नव्या गुंतवणूकदारांना बाजाराची खरी ओळख गेल्या आठवड्यातील मोठ्या चढउतारांनी करून दिली आहे. अशा चढउतारांचा जे धडा घेतात आणि अशावेळी जे टिकून रहातात, तेच शेअर बाजारातील गुंतवणुकीतून पैसा कमवतात. बाजारातीलमुलभूतधडे गिरविण्याची वेळ पुन्हा एकदा आली आहे.

सध्याचा बाजार हा हेलकावे खाणारा जरी वाटत असला तरी बाजाराची हीच खरी ओळख आहे. नवख्या गुंतवणूकदारांनी मागील एक-दोन वर्षं बाजार फक्त वरच जाताना पाहिलेला असल्यानं त्यांना आता धास्ती वाटणं साहजिक आहे. आणि हेच धास्तावलेले लोक अशा मोक्याच्या वेळी बाजारापासून दूर जाताना दिसतातआणि बाजारालाच दूषणं देत बसतात. आणि हेच झालंय मागील दशकांत.  अशी माणसं मग शेअर बाजारांपासून स्वतःला कोसो दूर ठेवतात व आम्ही सामान्य मध्यमवर्गीय म्हणून स्वतःला कोसत, स्वतःच्या कोषात अडकून बसतात.

आजच्या पिढीतील जे बुजुर्ग आहेत त्यांनी शेअरबाजार म्हणजे नक्की काय, त्याचे फायदे काय या गोष्टी जाणून न घेताच शेअर बाजार म्हणजे जुगार, सट्टा अशी शेलकी विशेषणं देऊन या व्यवसायात मुलांना न येऊ देण्यासाठी त्यांचे वेळोवेळी खच्चीकरण केलेले आढळते, अगदी मी स्वतः देखील यांतून सुटलेलो नाही.  जशी आपली नजर तसाच आपल्याला बाजार दिसतो, जर बाजारातून तुम्ही घबाडाच्या म्हणजे महिन्यांत दुप्पट किंवा दिवसाला 10% अशा स्वरूपाच्या अपेक्षा ठेवल्या आणि त्यांची पूर्तता न झाल्यास किंवा कोणाच्या सांगण्यावरून एखाद्या फॅन्सी कंपनीमध्ये गुंतवणूक करून नंतर ती कंपनी बुडल्यास अशा गुंतवणुकीस जुगारच म्हणता येऊ शकते. कारण असा विचार करणार्‍यांनी तशाच प्रकारच्या अपेक्षा शेअरबाजारातून बाळगलेल्या असतात. असे लोक देखील अशा प्रकारच्या गुंतवणुकीबद्दल फारसे गंभीर नसतात असे मला वाटते याचं कारण म्हणजे पैसे गुंतवताना अशा लोकांना जर आपण ते कोठे (कोणत्या कंपनीच्या शेअर्समध्ये) गुंतवत आहोत हे तपासणं महत्वाचं वाटतच नाही.

जुगाराची वेगळी व्याख्या म्हणजे कोणत्याही धंद्यात वरवरची उथळ माहिती घेऊन कोणतेही तारतम्य न बाळगता त्वरित स्वतःचे निष्कर्ष काढत व अंदाज लावत  घाईगडबडीनं त्यामध्ये सुरुवात (गुंतवणूक) करणं  आणि नुकसान झाल्यास त्या गोष्टीबद्दल नशिबाला दोष देणं. तसं पाहिलं तर आपल्या जन्मापासून सर्वच बाबतीत आपण जुगार खेळतच असतो आणि वेळेनुसार त्यास दूषणं न देता कॉम्प्रोमाईज करत, ऍडजस्टमेंट्स करत असतो. मग ती शाळानिवड असो, शिक्षणाच्या शाखेची निवड असो, नोकरी-धंदा निवड असो की लग्नासाठी जोडीदाराची निवड असो. म्हणून अशा गोष्टींपासून आपण लांब राहतो का ? जर उत्तर नाही असेल तर मग शेअरबाजार देखील यास अपवाद नको, अट एकाच की कोणतेही निर्णय अभ्यासपूर्वक घ्या मग यश अपयश तुमची जबाबदारी नव्हे.

दुसरी गोष्ट, मराठीत दलाल, दलाली, या शब्दांना हलक्या दर्जाची उपमा मानली जाते. कदाचित याच मुळंच दलाल स्ट्रीटला मनांत कधी मानाचं स्थान मिळालं नाही, आणि जेवढी होईल तितकी निर्भत्सना केल्यानं मागील एका पिढीनं, पुढच्या पिढीचं नुकसान केलेलं आढळतं. अगदी बापानं शेअरबाजारात लाखोंची उलाढाल केलेली असेल तरी स्वतःच्या मुलांना त्यापासून दूर ठेवणं यातच शहाणपण मानलं गेलंय. हेतू नक्कीच चांगला असला तरीही.

बँकेचे कमी व्याज दर,सोन्याचांदीत मिळणारा कमी परतावा आणि जोखीम, रिअल इस्टेटसाठी भरमसाठ गुंतवणूक आणि तरलतेची समस्या यांमुळं एकूणच कमी झालेलं आकर्षण यांमुळं आताची पन्नास, साठीची पिढी आत्मनिर्भर झाल्यावर बर्‍यापैकी शेअर बाजारांत पैसा गुंतवू लागली आहे, ज्याची मधुर फळं आपल्या वारसदारांना चाखायला मिळतील.

अनेकांनी आपापल्या परीनं शेअर शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी याचं विविध उपक्रमांद्वारे मार्गदर्शन केलेलं आहेच आणि मी देखील प्रामाणिकपणे या विषयवार गेली 4 वर्षं लिहीत असून लवकरच बाजारांतून पैसा कशा प्रकारे कमावता येऊ शकतो या विषयावर आता दोन दिवसांची विशेष कार्यशाळा घेणार आहे, जमल्यास प्रत्येक प्रमुख शहरांत, उद्देश हाच की शेअरबाजाराबद्दल न्यूनगंड न ठेवता त्यापासून आपला फायदा करता यावा.

गुंतवणुकीसंबंधी काही ठोस बाबी

1) शेअर बाजारात उतावीळपणा चालत नाही – जर एखाद्या बँकेत आपण मुदत ठेव दाम दुप्पट होण्यासाठी आठ ते दहा वर्षे ठेवतो, आणि बँक आपले ते पैसे कोणाला कोणत्या स्वरूपात देत आहे हे विचार करतो का ? आणि तिथं आपण दर दोन तीन महिन्यांनी जाऊन पहात नसतो की ते पैसे किती वाढले ते.. परंतु तेच पैसे शेअरबाजारात गुंतवल्यावर, मात्र रोज त्यातील उतरचढाव पाहून धास्तावतो आणि बाजारातील उतार-चढावच्या पटीत विनाकारण आपला रक्तदाब वाढवून घेत असतो.  योग्य कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास पैसे त्याच वर्षी दुप्पट देखील होऊ शकतात मात्र ह्या गोष्टीचा आधार घेऊन तशीच अपेक्षा बाळगणं चुकीचं ठरू शकतं. इथं आपण कंपनीच्या व्यवसायात अप्रत्यक्षपणे गुंतवणूक करत असतो त्यामुळं प्रश्न असतो संयम बाळगण्याचा. रोम वॉज नॉट बिल्ट इन वन डे, ही म्हण लक्षात ठेवा.

2) चिल्लर किंमतीचे शेअर कधीही घेऊ नका- अनेक लोक मला कमी भावाचे शेअर्सबद्दल विचारणा करतात परंतु अशा लोकांची मानसिकता ही सट्ट्याकडं झुकलेली असते. कमी भावात खूप प्रमाणात शेअर्स खरेदी करून एकदम अनेकपट पैसा कमावणं हे नेहमीच एक मोहजाळ असतं आणि भल्याभल्यांना याचा मोह पडत असतो. त्यामध्ये नवीन उतरणारे खेळाडू तर अलगद फसतात. बाजारातील काही ठग त्यांना फसविण्यासाठी आपण कसे यातून मोठे झालो हे भासवतात, आणि एक आभासी मृगजळ त्यांच्यासमोर उभं करतात व आपलं उखळ पांढरं करून घेतात. पेनी स्टॉक्स ज्या गतीनं वर जातात त्याच्या दुप्पट गतीनं  खाली घसरतात. आणि यामध्ये शंभर पैकी एखादाच (ऑपरेटर) पैसे कमावतो, इतर जण हात पोळून घेतात.

3) सखोल अभ्यास केल्याशिवाय कोणताच शेअर खरेदी करू नका.

मी नेहमी सांगत असतो की चांगला गुंतवणूकदार होण्यासाठी आपले डोळे व कान उघडे ठेवा. कोणत्या कंपनीचं कोणतं उत्पादन उत्तम मागणी राखतंय (उदा. नेस्लेची मॅगी, डॉमिनोजचा पिझ्झा, फेविकॉल, इ.) तसंच इतर कोणती कंपनी काय बनवते, जी वस्तू बनवते त्याची बाजारांत किती मागणी आहे, त्याचा वापर कोणत्या ठिकाणी होतो. पुढील दहा वर्षे त्या वस्तूची मागणी तशीच राहणार आहे कां, त्याची मालकी कुणाकडे आहे, मालक काटकसरी उद्योगपती आहे की उधळ्या, चैन करणारा आहे इत्यादी बाबी सहज पडताळून पाहता येऊ शकतात, जे फार महत्वाचं ठरतं. आज ज्या नावाजलेल्या कंपन्या आहेत त्यांचे मालक कितीही मोठे असले तरी आजही काटकसरीच आहेत. श्री रतन टाटा एकदा एका विदेशी हॉटेल मध्ये राहिले होते, तिथं शर्ट धुण्याचे पैसे खूप जास्त वाटल्यानं  त्यांनी स्वतःचा शर्ट स्वतःच धुतला व इस्त्री करून वापरला. श्री नारायण मुर्ती आजही विमानांत इकॉनॉमी क्लास मधून प्रवास करतात. त्यांचं म्हणणे आहे की मी बिझनेस क्लास मध्ये बसल्याने लवकर पोहोचणार नाही, मग इतके जादा पैसे कशाला देऊ. वॉरेन बफेट अजूनही साधं राहणीमान पसंद करतात अजूनही ते  1958 साली घेतलेल्या आपल्या घरात राहतात आणि तीच जुनी कॅडिलॅक गाडी वापरतात आणि याउलट विजय मल्ल्या, त्यांच्याबद्दल न लिहिलेलंच बरं.

4) टिप्स देणार्‍यांच्यावर, टिव्हीवरील उपदेशांवर अंधविश्वास ठेवू नका- टिव्हीवरच्या दिग्गजांनी कितीही एखाद्या कंपनीचं उज्वल भविष्य वर्तवलेलं असलं तरी, लगेचहा तो शेअर घेऊ नका. कदाचित त्यांना कोणीतरी पैसे देऊन बोलघेवडे बनवलेलं असू शकतं. टिव्हीवर शेअर मार्केटचे चॅनल फारसे भरावश्याचे नसतात आणि ते पाहून आपली गुंतवणूक करू नका तर आधी इतर सूत्रांद्वारे खातरी करा. जाहीर बातम्या जसे की कंपनीचे बोनस, डिव्हिडंड, इ. पुरतेच या चॅनल्सच्या भरवशावर राहा. अशा बातम्या पडताळून पाहण्याचा उत्तम स्रोत म्हणजे बीएसई किंवा एनएसईची संकेतस्थळं.

5) थोडेच खा पण चांगले खा – खूप जास्त कंपन्यांचे शेअर्स खरेदी करू नये. मोजक्याच पण दर्जेदार कंपन्या, (ब्लू चिप) निवडा. ब्लू चिप म्हणजे लार्जकॅप्स हा समज चुकीचा आहे. (उदा. एलआयसी आपले 22 कोटी शेअर्स आयपीओद्वारे विकत आहे समजा या कंपनीच्या शेअर्सची शेअरबाजारात 1000 रुपयांवर नोंदणी झाल्यास त्यांचं मार्केटकॅप (1000 द 22कोटी =22 हजार कोटी असेल, म्हणजे ही अजस्त्र कंपनी असूनही लार्जकॅपमध्ये येणार नाही)

6) थेंबे थेंबे तळे साचे – मासिक कमाईतला ठराविक हिस्सा नित्य नियमानं शेअरबाजारात स्टॉक किंवा म्युच्युअल फंडात एसआयपी करून गुंतवत राहा. हे लक्षात घ्या की, पैसे साठवल्यानं त्यांत वाढ होत नसते तर ते योग्यप्रकारे गुंतवावे लागतात.

7) पडत्या बाजाराकडं संधी म्हणून पहा- ज्याप्रमाणे 50% टक्के सेल लागल्यावर त्या वस्तूंसाठी आपण गर्दी करतो मात्र एखाद्या चांगल्या कंपनीचा शेअर 10-20 टक्के खाली आल्यावर आपण  हवालदिल होतो.बाजार खाली येताना एखाद्या चांगल्या कंपनीचा भाव तुम्ही घेतलेल्या भावावरून घसरू लागल्यास, त्याच्याकडे संधी म्हणून पहा. त्या घसरणार्‍या प्रत्येक टप्यावर गुंतवणूक करत रहा. कालांतराने त्याचा नक्की फायदाच होईल.

8) डोन्ट किप ऑल एग्स इन वन बास्केट – ज्या शेअरमध्ये पन्नास ते शंभर टक्के नफा झालेला आहे त्यातून काही मुद्दल काढून दुसर्‍या कंपनीत गुंतवा. सर्व पैसा एकाच कंपनीत ठेवू नका.

9) शेअर्सकडे दीर्घकाळ गुंतवणूक या नजरेनं पहा- पी हळद आणि  हो गोरी, हे इथे लागू पडत नाही. तुम्ही झाड लावायचे व मुलांनी फळ खायचे, या तत्वाचा अंगिकार करा.

10) स्लो अँड स्टेडी विंन्स द रेस – एखाद्या तिकिटांच्या रांगेत तुम्ही शेवटी उभे असलात म्हणजे कायम तुम्ही शेवट असणार असं नसतं. तुमच्या मागे रांग सुरूच असते. संयम बाळगण्यानं रांगेत हळूहळू तुम्ही पुढे सरकत राहता व अचानक तुम्ही खिडकी जवळ पोहोचलात की तुमचाही नंबर लागतोच, अगदी तसेच शेअर बाजारांत असते. आपण घेतलेल्या शेअर्सपेक्षा इतर शेअरचे भाव वाढल्यास आपले शेअर्स नुकसानीमध्ये विकून पळत्याच्या मागे लागू नका. तुम्हारा भी टाईम आयेगा भिडू..

-प्रसाद ल. भावे, अर्थप्रहर

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply