रायगड जिल्हाधिकार्यांनी महाराजस्व अभियानांतर्गत सर्वसामान्य जनता, शेतकरी, त्यांचे दैनंदिन प्रश्न त्वरित निकाली काढण्याच्या अनुषंगाने तसेच महसूल, प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्याच्या अनुषंगाने 23 डिसेंबर 2019 रोजीच्या परिपत्रकान्वये रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये गावनिहाय चावडी वाचन, अदालत, नोंदी, सत्यपत्रिकाच्या नोंदी, गवंड, रस्ते, मुक्ती तसेच इतर प्रलंबित नोंदी अद्ययावत करण्यासाठी महाराजस्व अभियानाचे आयोजन सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत करण्याचे जाहीर केले आहे.
पोलादपूर तालुक्यात 7 जानेवारीपासून या महाराजस्व अभियानाला सुरुवात झाली आहे. दिनांक 16, 18, 21, 23 आणि 25 जानेवारी रोजी गावनिहाय चावडी वाचन घेऊन महाराजस्व अभियान चालविण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी त्यांच्या महसूल विभागाची प्रलंबित कामाच्या अनुषंगाने संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याशी तसेच आवश्यकता असल्यास संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून चावडी वाचन अभियानाच्या दिवशी आपल्या प्रश्नांचे निराकरण करून घेण्यासाठी गाव चावडीवर उपस्थित राहण्याचे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
पोलादपूर तालुक्यातील 84 गावांच्या गावनिहाय चावडी वाचनाचा अधिकृत कार्यक्रम तहसीलदार दीप्ती देसाई आणि निवासी नायब तहसीलदार समीर देसाई यांनी नियोजनबद्ध केला असून पोलादपूर तालुक्यातील ग्रामस्थांनी या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
पोलादपूर तालुक्यातील सडवली, पोलादपूर, काटेतळी, चोळई, रानबाजिरे, चरई, तुर्भे खोंड, तुर्भे खुर्द, तुर्भे बुद्रुक, वझरवाडी, दिविल, पार्ले, लोहारे, धारवली, कालवली, हावरे, सवाद, माटवण, कणगुले, वावे, आंग्रेकोंड, वाकण, कापडे बुद्रुक, महालुंगे, घागरकोंड नानेघोळ, बोरावळे, रानवडी बुद्रुक, उमरठ, चांदके, खोपड, ढवळे, खांडज, देवळे, करंजे, हळदुळे, लहूळसे, रानकडसरी, केवनाळे, साखर, बोरज, चिखली, साळवी कोंड, आडावळे बुद्रुक, आडावळे खुर्द, मोरसडे, सडे, नावाळे, बोरघर, वडघर, कामथे, चांदले, कोंढवी, कातळी, ओंबळी, फणसकोंड, महालगुर, पांगळोली, पळचिल, गोलदरा, खडकवणे, भोगाव खुर्द, भोगाव बुद्रुक, धामणदेवी, चांभारगणी बुद्रुक, चांभारगणी खुर्द, ताम्हाणे, नीवे, किनेश्वर, कापडे खुर्द, देवपूर, तुटवली, देवपूर वाडी, गांजवणे, मोरगिरी, फौजदारवाडी, गोळेगणी, कोतवाल बुद्रुक, कोतवाल खुर्द, परसुले, पैठण, क्षेत्रपाळ, कुडपण बुद्रुक आणि कुडपण खुर्द या एकूण 84 महसुली गावांमध्ये महाराजस्व अभियान राबविण्याचे नियोजन असून यापैकी पोलादपूर आणि तुर्भे तलाठी सजातील महाराजस्व अभियानाच्या तारखा झाल्या असल्या तरी जोपर्यंत हे अभियान सुरू आहे तोपर्यंत या अभियानाच्या तारखा झाल्या तरीही त्यांचा लाभ घेता येणे शक्य आहे.
पोलादपूर, तुर्भे, लोहारे, धारवली, वाकण, उमरठ, साखर, मोरसडे, कोंढवी, पळचिल, चांभारगणी बुद्रुक, देवपूर, कोतवाल बुद्रुक आदी सजांमध्ये गेल्या 15 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीचे कायदेशीर आणि बेकायदेशीर व्यवहार होऊन कवडीमोलाने जमिनींची खरेदी-विक्री होताना बोगस नोंदी, बोगस व्यक्ती तसेच फसवणुकीचे प्रकार सातत्याने झाले असून कुटुंबातील मुलींचा वारस अधिकार अमान्य करण्याच्या प्रकारांमुळे मोठ्या प्रमाणात वाद होऊ लागले आहेत. एकत्र कुटुंबाचा पुढारी हा अन्य वारसांना जुमानत नसल्याने त्यांच्यावर भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. अनेक इस्टेट एजंट्स करोडपती होऊन काही रोडपतीही झाले आहेत. अनेकांना कमाल जमीन धारणा कायद्याने कारवाईस सामोरे जावे लागले आहे. दळी आदिवासी जमिनींची विक्री, महारवतनाच्या जमिनीची विक्री, आदिवासींची परंपरागत जमिनीची विक्री तसेच अनेक व्यवहारांमध्ये प्रशासन आणि एजंट्स यांचे साटेलोटे दिसून येत असून पोलिसांनी दाद न दिल्याने शक्य असलेल्यांना मुंबई उच्च न्यायालयातून दाद मागावी लागली आहे, तर ज्यांना शक्य नाही त्यांना जमिनीचे वारसदार असूनही मालकीविना भूमिहीन व्हावे लागले असल्याच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. खरेदी केलेल्या जमिनींवर बोजा चढवून अडकवून ठेवण्याची तसेच पुन्हा विक्री करण्याची प्रथा पोलादपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक तेजी आणणारी ठरली, मात्र या चोरांवर मोर होणार्या काही नॉनबँकिंग संस्थांनी या इस्टेट एजंट्सच्या ठेवी स्वीकारून पोबारा केल्याने त्यांचे दिवाळे वाजले आणि आर्थिक तेजी काही प्रमाणात मंदीत बदलली.
पोलादपूर तालुक्यातील महाराजस्व अभियानामध्ये होणार्या गावनिहाय चावडी वाचन, अदालत, नोंदी, सत्यपत्रिकाच्या नोंदी, गवंड, रस्ते, मुक्ती तसेच इतर प्रलंबित नोंदी अद्ययावत करण्यासाठीची उपयुक्तता ही संपूर्ण पोलादपूर तालुक्याचीही गरज झाली आहे.