रायगड़ जिल्ह्यासह कोकणाला 720 कि.मी.लांबीचा विस्तृत व अथांग असा सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे या ठिकाणी बहुतांश लोक मत्स्यव्यवसायावर आपली उपजीविका भागवत असतात. मात्र आजघडीला मत्स्यव्यवसाय चहूबाजुनी उद्ध्वत होताना दिसतोय. इथली मासेमारी समस्यांच्या जाळ्यात अडकली आहे. त्यामुळे मत्स्यव्यावसायिकांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. सततच्या वाढत्या कर्जाने आत्महत्या करण्याची नामुष्की देखील ओढवण्याची भीती मत्स्यव्यावसायिकांमध्ये आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन व कोकण किनारपट्टीत समुद्रकिनारी जेलिफिशचे थैमान सुरू झाले आहे. येथील कोळीबांधवांना मासेमारीत घातक जेलिफिशची वाढ झाल्याने मासळी मिळणे मुश्किल झाले आहे. या मुळे उत्पादन घटले आहे. परिणामी मच्छीमार संकटात सापडला आहेत. देशाला एकूण 7,516 कि.मी.चा सागरी किनारा लाभलेला आहे. ज्यावर एकूण 3288 मासेमारी गावे असून जवळपास 40 लाख लोक त्यावर अवलंबून असल्याचे केंद्रीय सागरी मत्स्य विभागाने 2010 मध्ये केलेल्या नोंदीतून समजते. रायगड़ जिल्ह्यातील समुद्रकिनारी दिघी, आदगाव, दिवेआगर, भरडखोल, जीवना, बागमांडला व मुरुड तसेच अलिबाग तालुक्यात देखील नवेदर नवगाव, रेवस, बोडणी, मांडवा, वरसोली अशी मासेमारीसाठी अनेक प्रसिद्ध बंदर आहेत. मात्र येथे जेलिफिशमुळे उत्पादनावर विपरीत परिणाम झाल्याने कोळीबांधव व मत्स्यव्यावसायिक चिंताग्रस्त आहेत.
अनेक स्थानिक या समुद्रामध्ये पारंपरिक पद्धतीने किंवा छोट्या होडीने मच्छीमारी करून उपजीविका करतात. दरम्यान वातावरणातील बदल, अवेळी वादळी पावसाची हजेरी अशा अनेक संकटांतून सामोरे जाऊन मासेमारी दुष्काळ सहन करतात. अवकाळी पाऊस व बदलणारे हवामान यामुळे मोठ्या प्रमाणात मासळी मिळणे फार मुश्किल झाले आहे. आठ ते दहा दिवस खोल समुद्रात जाऊन सुद्धा पुरेशी मासळी मिळत नसल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत. डिझेल खर्च, बर्फ व होडीवर काम करणार्या लोकांची मजुरी सुद्धा सुटत नाही. त्यामुळे हा व्यवसाय कसा करावा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे . त्यातच सध्या खोल समुद्रात जेलिफिश वाढल्याने जाळ्यात त्याचेच प्रमाण जास्त असल्याने मासळी फार कमी मिळत आहे. अवकाळी पाऊस व वादळामुळे मच्छिमारांनी सध्या होड्या समुद्रकिनारी नांगरल्या आहेत.
मुरुड तालुक्यात छोटया व मोठ्या अशा एकूण 650 होड्या असून त्यापैकी निम्यापेक्षा जास्त होड्यांनी किनारा गाठला आहे. मागील दोन वर्षांपासून चक्रीवादळ, निसर्ग बादळ, अवकाळी पाऊस यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला व मासळी दूरवर निघून गेल्याने पुन्हा एकदा बोटी किनार्याला परत आलेल्या आहेत.
जूनला शासनातर्फे मासेमारी न करण्याचे आदेश दिले जातात त्यावरून साधारतः 28 मे पासून मच्छिमार होड्या किनार्याला लावत असतात. परंतु यंदा जेलिफिशचा फटका बसून मासळीच मिळत नसल्याने मच्छीमारांनी स्वतःहून लवकरच होड्या किनार्यावर साकारून पुन्हा मासेमारीला न जाण्याचे ठरविल्यामुळे एकदरा पुलाच्या कठड्याला जाळ्या सुकविण्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यंदा किमान एक महिना अगोदर मासेमारीचा काळ समाप्त झाला असून खूप लवकर मासेमारी संपुष्टात आली आहे . मासळी नसल्यामुळे होड्या किनारी आल्याने कोळीबांधवांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान खोल समुद्रात गेल्यावर फिशिंगवाले व जाळीवाले मासेमारीचे उत्पादन कमी झाले आहे. मासेमारीत डोलवीमध्ये मोठ्या प्रमाणात जेलिफिश अडकल्याने ती शरीराला घातक ठरत आहे. हातापायांना, डोळ्यांना इजा होण्याची भीती मासेमारीला निघताना मनात कायम असते असे जीवना कोळीवाडाचे माजी चेअरमन बाळकृष्ण रघुवीर यांनी सांगितले. तसेच भरडखोल येथील मच्छीमार कल्पेश पावशे यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाने ग्रामीण भागातील अनेकांचे व्यवसाय हिरावले. पर्यटनावर अवलंबून असणार्या मासेमारी व्यवसायासोबत अनेक व्यवसाय बंद होते. श्रीवर्धनमधील पर्यटन हंगामाला जोर मिळत असतानाच मासेमारी व्यवसाय जेलिफिशमुळे मोठ्या संकटात सापडला आहे.
मागील काही वर्षात जेलीफिशचे प्रमाण रायगड़, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , पालघर या सागरी कोकण किनार पट्टीत वाढल्याचे दिसत आहे. जेलीफिशच्या उपद्रवाने मत्स्य उत्पादन घटते आहे. सागरात येणारी वादळ , वातावरणातील बदल, अन्न साखळी मधील बदल झाल्यानंतर जेलिफिशला खाद्य पदार्थाची विपुलता किनारपट्टीवर अधिक आढळण्याची शक्यता असते. सागरातील जीवाणु हे खाद्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. त्यामुळे एखाद्या जिवाणुची संख्या कमी अथवा जास्त होताना दिसते. सध्या जेलिफिशचे प्रमाण वाढल्याचे दिसते असे सहाय्यक मत्स्य आयुक्त सुरेश भारती यांनी सांगितले.
वाढते जेलिफिश चिंताजनक बाब
जगभरात माणसाला माहित असलेल्या जेलिफिशच्या जवळपास 1200 प्रजाती आहेत. त्यातील काही एवढ्या लहान आहेत की त्या पोहताना पाण्यासोबत आपल्या पोटात जाऊ शकतात तर काही 200 किलो एवढ्या अवाढव्य आहेत. या प्राण्यांमध्ये सर्व जातीत एक गोष्ट सारखी असते ती म्हणजे डंख मारणार्या पेशी होय. या पेशी जेलीफिशच्या फ्लोट खाली असतात. या तंतुमय धाग्यांमध्ये विणलेल्या डंख मारणार्या पेशी एखाद्या समुद्री जिवाच्या संपर्कात आल्यास त्याला या तंतुमय धाग्यांनी गुंडाळून त्यात असलेल्या लाखो विषारी डंख प्राण्याच्या शरीरात विष पसरविण्याचे काम करतात. ब्लू बॉटल प्रजातीच्या जेलिफिशला चुकून जरी हात लागला तरी तुम्हाला तीव्र वेदना आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. बॉक्स जेलिफीश प्रजातीमुळे फिलिपाईन्स देशात दर वर्षी 20 ते 40 लोक मृत्युमुखी पडत असल्याच्या वैद्यकीय नोंदी आहेत. हे प्राणी स्वत: पोहत नाहीत. समुद्राचे प्रवाह जिथे घेऊन जातील तिथे ते जातात. पण अलीकडे अरबी समुद्रात यांचे प्रमाण कमालीचे वाढत आहे ही खूप चिंताजनक बाब आहे.
कोळीबांधवांची आर्थिक स्थिती बिकट
जेलीफिश अत्यंत घातक व विषारी आहे. जेलिफिशने शारीरिक व आर्थिक हानी होतेय. आज नैसर्गिक संकटे देखील कोळी बांधवांना जगू देत नाहीत. आम्ही वारंवार सरकारकडे निवेदनाद्वारे प्रश्न व समस्या मांडतोय, मात्र सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. जेलिफिशने मत्स्य उत्पादन घटल्याने मच्छीमार कोळी बांधवांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली असल्याचे महादेव मच्छीमार संघटनेचे चेअरमन उल्हास वाटखरे यांनी बोलताना सांगितले.
त्वरीत शासन मदतीची अपेक्षा
सद्या कोळीबांधवांच्या पदरात फायद्यापेक्षा खोट पडत आहे. मासेमारी नौका किनार्यालाच उभ्या असल्याने नोकरांचे पगार, डिझेल, भत्ता खर्च, जाळीखर्च व कर्जाचे थकलेले हप्ते कसे भरायचे असा प्रश्न पडला आहे. जेलिफिश सारखी नैसर्गिक अपत्तीने अनेकांचे व्यवसाय ठप्प आहेत. त्याकरिता शासन स्तरावर आम्हा कोळी बांधवांना मदत मिळावी असे दिघी कोळी समाज अध्यक्ष किरण कांदेकर यांनी या दरम्यान बोलताना सांगितले.
-धम्मशील सावंत, खबरबात