सर्व दोषींवर ठोस कारवाई कधी होणार?
ठेवीदारांना हक्काचे पैसे परत कसे मिळणार?
पनवेल : प्रतिनिधी
कर्नाळा बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामिनाचा निर्णय न्यायालय बुधवारी (दि. 13) होणार्या सुनावणीदरम्यान देणार आहे. या वेळी विवेक पाटील यांची जामिनावर का होईना पण सुटका होईल, अशी आशा शेकाप कार्यकर्त्यांना वाटत आहे, मात्र कर्नाळा बँक घोटाळ्याचे सूत्रधार विवेक पाटलांसह सर्व दोषींविरुद्ध काय ठोस कारवाई होणार तसेच ठेवीदार, खातेदारांना त्यांचे हक्काचे पैसे परत कधी मिळणार हे प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत.
गेले अनेक महिने सुनावणी सुरू असलेल्या या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, कर्नाळा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना 15 जून 2021 रोजी ‘ईडी’ने कर्नाळा बँकेतील 529 कोटींहून अधिक रुपयांच्या घोटाळाप्रकरणी अटक केली, मात्र महाराष्ट्र सरकारच्या सहकार आणि पोलीस या दोन्ही खात्यांनी या प्रकरणी कोणतीही कडक कारवाई केली नाही. ‘ईडी’ची कोठेडी संपल्यावर विवेक पाटील यांना आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते.
विवेक पाटील यांच्या वकिलांनी वैद्यकीय कारणाखाली त्यांना आर्थर रोड जेलऐवजी तळोजा कारागृहात हलवण्याची मागणी केली. ती मंजूर करण्यात आली. ईडीने त्यांच्यावर 12 ऑगस्ट 2021 रोजी आरोपपत्र दाखल केले. त्यावरील सुनावणीत त्यांनी त्यांच्या जामिनासाठी न्यायालकडे अर्ज केला. त्याचा निकाल बुधवारी (दि. 13) लागणार आहे. या संपूर्ण कालावधीत सत्र न्यायालयात वेगवेगळ्या तीन अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी सुनावणी केली.
या खटल्याच्या आतापर्यंत 36 वेळा तारखा पडून कामकाज झाले. यात ‘ईडी’तर्फे अॅड. सुनील गोन्साल्वीस, अॅड. वेनेगावकर यांनी काम पहिले, तर विवेक पाटील यांच्यातर्फे अॅड. सुबीर सरकार, अॅड. पवन चेढ्ढा, अॅड. ऋषिकेश मुंदरगी, अॅड. अशोक मुंदरगी, अॅड. राहुल ठाकूर, अॅड. चेतन ठाकूर यांनी बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला.
मोदी सरकारमुळे ठेवीदारांना दिलासा
कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना ‘डिपॉझिट इन्शुरन्स अॅण्ड क्रेडिट गॅरन्टी’कडून पाच लाखांपर्यंतच्या ठेवींची रक्कम देण्यात येत आहेत. ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन हा भारतीय रिझर्व्ह बँकेचा एक विशेष विभाग आहे, जो भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. 15 जुलै 1978 रोजी ठेव विमा आणि क्रेडिट हमी कॉर्पोरेशन कायदा 1961 अंतर्गत ठेवींचा विमा आणि क्रेडिट सुविधांची हमी देण्याच्या उद्देशाने याची स्थापना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील विद्यमान केंद्र सरकारने त्यामध्ये बदल करून विम्यातून मिळणार्या रकमेत वाढ करून एक लाखाऐवजी पाच लाख रूपयांपर्यंत वाढ करण्यात आली तसेच बँक अवसायनात निघल्यास 90 दिवसांत हे पैसे खातेदारांना परत देण्याची तरतूद केल्याने हे पैसे मिळत आहेत.
आतापर्यंत सात हजार 900 ठेवीदारांना 151 कोटींचे वाटप झाले आहे. यातील पहिला टप्पा महिनाभरात पूर्ण होईल. ज्यांनी अर्ज केले आहेत, पण ते काही कारणामुळे पैसे घेण्यासाठी आले नाहीत त्यांच्यासाठी (नावाच्या आद्याक्षरांनुसार म्हणजेच अल्फा बेटिकल ए ते एन) 18 एप्रिल 2022 हा दिवस ठेवला आहे. त्या दिवशी त्यांना येण्याचे आवाहन प्रशासक ए. आर. हांडे यांनी केले आहे.
शेकापच्या कट्टर कार्यकर्त्यांचा आपल्याच नेत्यांवर रोष
कर्नाळा बँकेच्या खातेदार आणि कर्जदारांना कोट्यवधी रुपयांना डुबवून सध्या जामिनाच्या प्रतीक्षेत असलेले कर्नाळा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना जामिन मिळेल या आशेवर शेकाप कार्यकर्ते आजही आहेत. याबाबत बुधवारी न्यायालयात होणार्या सुनावणीत स्पष्ट होईल, पण साहेबांना (विवेक पाटील) देव मानणार्या कट्टर शेकाप कार्यकर्त्यांना आजही वाटत आहे की, साहेब येतील आणि पुन्हा पहिल्यासारखे दिवस येतील. येणार्या निवडणुकीत साहेब पुन्हा पैसे खर्च करतील, असा विश्वासही त्यांना वाटत आहे, मात्र शेकापच्या सध्याच्या काही नेत्यांवर मात्र या कट्टर कार्यकर्त्यांचा राग आहे. यातील काही नेत्यांनी वेळोवेळी विवेक पाटीलसाहेबांकडून निवडणुकीसाठी पैसे घेतले आणि ते कधीही परत तर केले नाहीत आणि त्याचा खाजगीतही कधीही उच्चार केला नाही, असे कट्टर कार्यकर्त्यांनी आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
खाऊन झाले, आता ढेकरही देत नाहीत..!
निवडणुकीच्या काळात तर ठरावीक नेत्यांनी आपली पोटं पैशांनी भरली. भरपूर खाल्लं, पण आता ढेकरही देत नाहीत. सगळा त्रास जो काही आहे तो आमच्या साहेबांनाच (विवेक पाटील), अशीही संतप्त प्रतिक्रिया शेकापच्याच कट्टर कार्यकर्त्याने व्यक्त केली.
‘मविआ’च्या कुबड्यांचा शेकापला आधार
सध्या महागाईसारखे विविध मुद्दे काढून बैठका घेण्याचा सपाटा शेकापने लावला आहे. मुळात शेकापची राजकीय ताकद रायगड जिल्ह्यात कमी झालेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नावाखाली शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लोकल नेत्यांना पाचारण करून आंदोलनाच्या घोषणा तूर्त केल्या जात आहेत. विवेक पाटील जेलबाहेर आल्यानंतरच शेकापच्या उद्योगांना ‘रंग’ येईल, अशीही समाजात चर्चा आहे, मात्र तब्ब्येतीमुळे विवेक पाटील राजकारणात सक्रिय राहणार नाही, असेही शेकापच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
सहकार विभागाकडून दोषी संचालकांवर वसूली रक्कम निश्चित
कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील 529 कोटी 36 लाख 55 हजार 26 रुपयांच्या कर्ज घोटाळाप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील आणि त्यांचा मुलगा अभिजित विवेक पाटील यांच्यासह 19 संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जबाबदार धरण्यात आले असून त्यांच्यावर आणि मृत संचालकाच्या वारसांवर आरोपपत्रही बजावण्यात आले आहे. या सर्वांवर कर्जाच्या नुकसानीची वसुली करण्याच्या रकमादेखील निश्चित करण्यात आल्या असून, त्या प्रत्येकी 16 ते 29 कोटी रुपये आहेत. त्यामुळे विवेक पाटील यांनी भ्रष्टाचाराने लाटलेला पैसा आपण कसा भरायचा असा प्रश्न आता उर्वरित संचालकांपुढे पडला आहे.
बँकेचे तत्कालीन संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, पदाधिकारी, व्यवस्थापक यांनी केलेले बोगस कर्जवाटप, अपकार्य, विश्वासघात, आर्थिक गैरव्यवहार यामुळे कर्नाळा बँक अडचणीत आली. जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी 13 डिसेंबर 2019 रोजी सादर केलेल्या विशेष लेखापरीक्षण अहवालामुळे ही बाब उघडकीस आली.