कर्जतमधील घटना अनैतिक संबंधाचा संशय; आरोपी अटकेत
कर्जत ः बातमीदार
कर्जत तालुक्यातील खाड्याचा पाडा येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका तरुणाचा त्याच्याच मित्राने दुसर्या एकाला सोबत घेऊन खून केल्याची घटना गुरुवारी (दि. 19) रात्री घडली. अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याचा पोलिसांना संशय असून पोलिसांनी दोन्ही तरुणांना अटक केली आहे. नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील खाड्याचापाडा येथील सुभाष रामू खाडे हा गुरुवारी रात्री उशिरा घरी परत आला नाही म्हणून त्याचा मोठा भाऊ गणेश खाडे त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या मित्राकडे पाषाणे कातकरी वाडी येथे पोहचला. त्या वेळी तेथे मोतीराम बबन वाघ आणि शंकर नथू वाळवी हे दोघे लोखंडी हत्याराने सुभाषला मारत होते. गणेशला पाहून दोघेही पळून गेले. त्यानंतर गणेशने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुभाषला रुग्णवाहिकेतून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी सुभाषचा मृत्यू झाला असल्याचे जाहीर केले. दरम्यान, पोलिसांनी गणेश खाडे याच्या तक्रारीनंतर मोतीराम बबन वाघ आणि शंकर नथू वळवी या दोघांना मध्यरात्री ताब्यात घेऊन सुभाष खाडेच्या खूनप्रकरणी अटक केली. या दोघांवर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मयत तरुण हा रायगड पोलिसांकडून तडीपार केलेला गुन्हेगार होता. त्याच्यावर मोक्का अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियत्रंण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. तो व त्याचा खून करणारा मोतीराम वाघ हे एका गुन्ह्यात सामिल होते. मित्र असलेले हे दोघे एकमेकांच्या घरी जात असत. मयत सुभाषचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून त्याला मोतीरामने कातकरी वाडीत बोलाविले आणि त्याला दारू पाजून मित्र शंकर वळवीच्या मदतीने लोखंडी हत्याराने जीवे मारले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.