खोल समुद्रात जाण्यास मज्जाव; आठ दिवसात हंगाम थांबणार
अलिबाग: प्रतिनिधी
सागरातील माश्यांचे जनत व्हावे या उद्देशाने कोकण किनारपट्टीवर मत्स्य प्रजनन काळात यांत्रिकी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 1 जुन ते 31 जुलै या कालावधीत हे बंदी आदेश कायम राहणार आहे. सहाय्यक मत्सव्यवसाय विभागाने हे आदेश जारी केले आहेत.
या कालावधीमध्ये मासळी व सागरी प्राण्यांचे मोठया प्रमाणात प्रजनन होत असते. तसेच समुद्रात नद्यांव्दारे मोठया प्रमाणात खनिजद्रव्य वाहत जातात. त्याचप्रमाणे क्षारतेचे प्रमाण कमी होते आणि अपवेलिंगमुळे देखील समुद्राच्या तळातील मुलद्रव्ये पाण्याच्या वरच्या थरात येतात. त्यामुळे प्लवंग निर्मिती मोठया प्रमाणावर होऊन मासळीच्या लहान जीवांना पोषक वातावरण तयार होते. परिणामी मासळीच्या साठयाचे जतन होते. त्याशिवाय या कालावधीत वादळी हवामान असल्याने जिवीत व वित्त हानी होण्याची शक्यता असते. त्यापासून मच्छिमारांचे संरक्षण व्हावे या हेतूने वरील कालावधीत यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारीस बंदी घालण्यात आलेली आहे.
या बंदी कालावधीत सागरी कायद्याचा भंग करुन मासेमारी करणार्या मच्छिमारां विरुध्द कारावी करण्याचा इषारा मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे. 1 जून ते 31 जुलै 2022 या कालावधीत यांत्रिक नौका मासेमारीस गेल्या असता अपघात झाल्यास त्यासंबंधीची कोणतीही नुकसान भरपाई शासनाकडून मिळणार नाही, नौका पुनर्वसनासंबंधीचा प्रस्ताव विचारात घेण्यात येणार नाही, बंदी कालावधीत अपघाताने मच्छिमारांवर मृत्यू ओढवल्यास त्याच्या वारसांना कोणत्याही प्रकारची मदत/अर्थसहाय्य शासनाकडून मंजूर कले जाणार नाही, बंदी कालावधीत ज्या मासेमार संस्थांच्या सभासदांच्या नौका मासेमारी करताना आढळतील त्या संस्थांचे राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेखाली पुरस्कृत केलेले अर्ज अर्थसहाय्य मंजूरीसाठी शिफारस केले जाणार नाहीत. तसेच शासनाच्या कोणत्याही अर्थसहाय्याच्या योजनांचा लाभ संस्थेच्या कोणत्याही सभासदास अनुज्ञेय राहणार नाही, बंदी कालावधीत बेकायदेशीर मासेमारी करणार्या नौका मालकांविरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल असा इषारा मत्स्यव्यवसाय विभागाने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आला आहे. बंदी कालावधीत कोणतीही यांत्रिक मासेमारी नौका कोणत्याही कारणास्तव समुद्रात जाणार नाही, याची संबंधितांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी असे आवाहन सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) एस.आर भारती यांनी केले आहे.
जिल्ह्यात साडेतीन हजार यांत्रिकी नौका
रायगड जिल्ह्यात साडे तीन हजार यांत्रिकी नौका आहेत. या नौकांवर जवळपास तीस ते पस्तीस हजार लोक काम करतात या सर्वांसाठी हे आदेश जारी करण्यात आले आहेत. बंदी आदेश लागू असे पर्यंत मच्छीमारांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.