Breaking News

रायगडात शिवसेना-राष्ट्रवादी वाद विकोपाला

काम करण्यात अडचणी येत असल्याची आमदार गोगावलेंची तक्रार

श्रीवर्धन, पोलादपूर ः रामप्रहर वृत्त

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदार आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे. नुकतेच शिवसेनेचे महाडमधील आमदार भरत गोगावले यांनी श्रीवर्धन व पोलादपूर येथे झालेल्या शिवसंपर्क अभियान कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे व पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याविरोधात आरोप करून आपली नाराजी व्यक्त केली. या कार्यक्रमात आमदार भरत गोगावले म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव खासदार व पालकमंत्री असे आहेत की, जे शिवसेनेच्या माध्यमातून आलेला विकासनिधी न वापरता तो परत कसा जाईल, यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे महाविकास आघाडीच्या चौकटीत राहून काम करणे अडचणीचे ठरत असल्याची तक्रारही त्यांनी केली. रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीतील दोन महत्त्वाचे पक्ष असणार्‍या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद आता उघडपणे होत असून कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत स्वबळावर सत्ता आणण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे. त्याचे संकेत शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानातून दिले जात आहेत. स्थानिक निवडणुकांमध्ये आघाडी कराची किंवा नाही याचा निर्णय पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असेही सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्वच ठिकाणी फूट पडत असल्याने याचा फटका आगामी निवडणुकांमध्ये बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या वेळी आमदार भरत गोगावले यांनी महाविकास आघाडीच्या चौकटीत राहून काम करण्यात अडचणी येत असून मित्रपक्ष असूनही राष्ट्रवादी काँग्रेस केवळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना फितवून त्यांना आपल्या पक्षाकडे वळविण्याचे काम करीत असल्याचा आरोप करून महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला.

‘पालकमंत्री हटाव’ मोहीम

पालकमंत्री कोणत्याही आमदाराला घेऊन चालत नाहीत. विकासकामांच्या उद्घाटनाचा किंवा कुठलाही कार्यक्रम असू दे शिवसेनेच्या तीन आमदारांना योग्य सन्मान दिला जात नाही, अशी तक्रार यापूर्वीही झाली आहे. याशिवाय जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार आहे. मग पालकमंत्रीपद शिवसेनेच्या कोणत्यातरी एका आमदाराकडे देण्यात यावे, अशी मागणी सर्व शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी मात्र या मागणीची फारशी दखल घेतलेली नाही.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply