Breaking News

अजगराची हत्या लाईव्ह करणे पडले महागात

पेणमध्ये पाच जण अटकेत

पेण : प्रतिनिधी

सोशल मीडिया अर्थात समाजमाध्यमांवर लाइव्ह व्हिडीओ करण्याची के्रझ तरुणाईमध्ये हल्ली वाढत आहे. अशाच प्रकारे जंगलात अजगर पकडून त्याची हत्या करण्याचा लाइव्ह व्हिडिओ फेसबुकवर प्रसिद्ध करणे पेणमधील पाच तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी या तरुणांना अटक केली आहे.

पेण तालुक्यातील खरबाचीवाडी येथील नितीन लहू शीद, विजय बाळाराम शीद, एकनाथ धर्मा वाघ, हरिश्चंद्र येसू शीद व राम लक्ष्मण भल्ला या पाच तरुणांनी शुक्रवारी (दि. 15) गावानजीकच्या जंगलात एक मोठा अजगर पकडला आणि त्याला मारतानाचा लाइव्ह व्हिडिओ फेसबुकवरून सोशल मीडियात प्रसिद्ध केला होता.

अजगराला मारताना व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याने अलिबागचे सहाय्यक वनसंरक्षक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पेण वनविभागाचे वनक्षेत्रपाल प्रसाद गायकवाड, धामणी येथील वनपाल जे. आर. घरत,पेण चे वनपाल चौधरी, निधवली वनपाल ए. एम. काटकर, आपटे वनपाल आडे, गागोदे वनपाल अडकर यांच्यासह पेण पोलीस यांच्या पथकाने खरबाची वाडीत छापा टाकून पाच संशयित आरोपींना वन्यजीव संरक्षक कायदा 1972चे कलम 9, 5152 अन्वये रविवारी अटक केली. या आरोपींना सोमवारी (दि. 18) पेण न्यायालयात हजर केले असता, त्यांना 22 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply