कर्जत तालुक्यात कशेळे येथील ग्रामीण रुग्णालय अनेक विविध सुविधांपासून आजही वंचित आहे. 30 वर्षांपूर्वी उभ्या राहिलेल्या या ग्रामीण रुग्णालयात पूर्ण क्षमतेने बेड देखील उपलबध नाहीत आणि रुग्णालय सुरु झाल्यापासून अद्याप वैद्यकीय अधीक्षक या रुग्णालयाला मिळाले नाही.
कर्जत तालुक्यातील अर्ध्या आदिवासी भागातील जनतेचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून कशेळे गावाची ओळख आहे. आदिवासी भाग लक्षात घेऊन शासनाने या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी कशेळे गावातील चार ग्रामस्थांनी 24 गुंठे जमीन शासनाला देऊ केली आणि 1974मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु झाले. रुग्णांची गर्दी लक्षात घेऊन ग्रामीण भागातील रुग्णांचा आधार लक्षात घेऊन या प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर 1986 मध्ये ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. शासनाने त्या वेळी घोषित केलेले 30 बेडचे ग्रामीण रुग्णालय आजही कागदावरच आहे असे म्हणावे लागेल. ग्रामीण रुग्णालय 30 बेडचे म्हणून सुरु करण्यात आले पण 35 वर्षे हे रुग्णालय 20 बेडचे रुग्णांना म्हणूनच सुरु आहे. इमारती बांधण्यात आली. त्या वेळी 20 बेडचे रुग्णालय सुरु झाले ते आजही 20 बेडचेच असून 10 बेड लावायला जागा शासन आजपर्यं उपलब्ध करून देऊ शकले नाही. त्यात ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती झाली. त्यावेळी हे रुग्णालयात चार एमबीबीएस दर्जाचे डॉक्टर आणि मेडिकल सर्जन दर्जाचा वैद्यकीय अधीक्षक अशा जागा मंजूर होत्या. मात्र आजपर्यंत या ग्रामीण रुग्णालयाला मेडिकल सर्जन दर्जाचा वैद्यकीय अधीक्षक मिळाला नाही. ही शोकांकिता असून वैद्यकीय अधिकारी दर्जाचे डॉक्टर यांच्यावर वैद्यकीय अधीक्षक यांची प्रभारी जबाबदारी रुग्णालय सुरु झाले तेव्हापासून आहे ती आजही कायम आहे. त्यात आज देखील दोन पेक्षा अधिक एमबीबीएस दर्जाचे डॉक्टर यांच्यापुढे या रुग्णालय वैद्यकीय अधिकारी आले नाहीत. त्यामुळे 20 बेडचे रुग्णालयाचा भार दोन वैद्यकीय अधिकारी वाहत आहेत.
रुग्णालयासाठी शासनाच्या दोन रुग्णवाहिका मंजूर असून त्यापैकी एक रुग्णवाहिका नादुरुस्त अवस्थेत अनेक वर्षे गोडाऊनमध्ये पडून आहेत. शासनाने गतवर्षी कोविड काळात कशेळे ग्रामीण रुग्णालयासाठी एक रुग्णवाहिका दिली आह. पण त्या रुग्णवाहिकेला चालक दिला नाही. त्यामुळे चालकाविना रुग्णवाहिका रुग्णालयाच्या आवारात धूळखात पडून आहे. 50पेक्षा अधिक गावे आणि तितकीच आदिवासी पांडे यांचे आरोग्य ज्या ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहे त्या कशेळे ग्रामीण रुग्णालयामध्ये स्त्री रोगतज्ञ डॉक्टर नसल्याने गरोदर महिला प्रसूतीसाठी आल्यानंतर तेथे सीझर करण्याची वेळ आली तर भूलतज्ञदेखील उपलब्ध नाही. त्यामुळे नैसर्गिक प्रसूती वगळता अन्य प्रकारच्या प्रसूती या रुग्णालयात होत नाहीत. त्यामुळे नैसर्गिक प्रसुती होणार नसलेल्या गरोदर मातांना पुढे कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. कर्जत उपजिल्हा रुग्णालयात देखील स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने आदिवासी भागातील गरोदर मातांची हेळसांड होते. मग या गरोदर महिलाना खासगी रुग्णालयात नाईलाज म्हणून जावे लागते.
कशेळे ग्रामीण रुग्णालयात जे दोन डॉक्टर सेवा देत आहेत,त्यातील एक डॉक्टर हे हाडांचे तर दुसरे बालरोग तज्ञ आहेत. हाडांचे डॉक्टर असलेले डॉ विक्रांत खंदाडे यांच्यावर वैद्यकीय अधीक्षक पदाची जबाबदारी असून त्यांच्याकडून नियमित पणे शस्त्रक्रिया सुरु असतात ही या रुग्णालयाची काहीशी जमेची बाजू आहे. 1986 साली सुरु झालेल्या या रुग्णालयात ना आयसीयू आणि ना अतिदक्षता विभाग आहे. मात्र आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी दोन वॉर्डमध्ये प्रत्येकी पाच पाच बेड हे ऑक्सिजन बेड म्हणून तयार ठेवले आहेत. त्या ठिकाणी अतिदक्षता रुग्णांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने ऑक्सिजन लावण्याची वेळ रुग्णालयात येत नाही. त्यामुळे 10 ऑक्सिजन बेड ही सुविधादेखील बिनकामाची ठरत आहे.
कशेळे ग्रामीण रुग्णालयात टेक्निशयन यांची उपलब्धता असल्याने प्रयोगशाळेत सर्व चाचण्या होत असतात. त्यात जनरल टेस्टसह साथीचे रोग, किडनी, लीव्हर, एडस यांच्या देखील टेस्ट केल्या जातात. सर्प दंश असे रुग्ण कशेळे ग्रामीण रुग्णालयात सर्वाधिक येत असतात आणि त्यांना सेवा या ठिकाणी मिळत असते.सोनोग्राफी आणि सर्व प्रकारचे एक्स रे यांची सुविधा देखील सुस्थितीत असून आदिवासी आणि दारिद्र रेषेखाली रुग्णांसाठी मोफत सेवा कशेळे ग्रामीण रुग्णालय देत असते. सर्व आजारांवर डॉक्टर उपलब्ध नसल्याने या रुग्णालयात शासनाच्या वतीने वर्षातून दोन वेळा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य यंत्रणा यांच्याकडून आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित केली जात असतात.पिण्याचे पाण्याची टंचाई पूर्वी सतत जाणवायची आणि त्यावेळी ट्रँकर मागवावे लागायचे.
विविध समस्यांचा विळखा
कशेळे गावासाठी नवीन नळपाणी योजना कार्यान्वित झाल्याने पाण्याची समस्या दूर झाली आहे. या रुग्णालयाच्या छपरावर आता पत्र्याचे शेड बसविली आहे. त्यामुळे त्या भागात मोठ्या प्रमाणात नवीन वॉर्ड तयार होऊ शकतात. मात्र त्यासाठी इच्छाशक्ती आवश्यक आहे. कर्जत तालुक्यातील पहिले ग्रामीण रुग्णालय आजही समस्यांच्या जंजाळात दिवस पुढे ढकलत आहे. आदिवासी तालुका असलेल्या कर्जत तालुक्यासाठी आणि आदिवासी भागात सुरु झालेले कशेळे येथील ग्रामीण रुग्णालय शासनाच्या दृष्टीने दुर्लक्षित रुग्णालय आहे. अनेक समस्यांचा सुकाळ यामुळे तुझ्यावर माझा भरवसा नाही असे म्हणण्याची वेळ आदिवासी भागातील जनतेवर आहे.
-संतोष पेरणे, खबरबात