Breaking News

कर्णकर्कश आवाजापासून होणार मुक्तता

47 सायलेन्सरवर वाहतूक शाखेने फिरवला रोडरोलर

पनवेल ः वार्ताहर

कर्णकर्कश आवाज करणार्‍या 47 सायलेन्सरवर रोडरोलर फिरवून नष्ट करण्याची कारवाई पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शुक्रवारी (दि. 2) वाहतूक शाखेने केली आहे. सध्याच्या तरुणाईमध्ये कर्णकर्कश्य आवाज करणारे सायलेन्सर दुचाकींना लावून वेगाशी स्पर्धा करण्याचे वेड वाढले आहे. यामुळे मात्र परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत असतो. त्याचप्रमाणे ध्वनीप्रदूषणही होत आहे. त्यामुळे उच्च न्यायालयानेदेखील वाहनांच्या आवाजाबाबत नियम

निर्देशित केले आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करताना नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे आणि पथकाने कर्णकर्कश्य आवाज करणार्‍या दुचाकींवर कारवाई करून त्यांचे सायलेन्सर जप्त करण्यास सुरुवात केली आहे. जप्त केलेल्या सर्व सायलेन्सरवर रोडरोलर चालवून ते नष्ट करण्यात आले. जवळपास 47 सायलेन्सर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शुक्रवारी सकाळी नष्ट करण्यात आले आहे. या कारवाईवेळी पनवेल वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे, पोलीस उपनिरिक्षक खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस हवालदार श्रीगणेश, पो. ना. हनुमान आंधळे, पो. शि. बादल यांच्यासह नागरिक उपस्थित होते, तसेच यापुढेदेखील कर्णकर्कश्य आवाज करणार्‍या सायलेन्सरवर कारवाई सुरूच राहिल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी दिली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply