Breaking News

कोरोना पाठ सोडेना!

कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचे नवे उत्परिवर्तनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. एकीकडे राज्यातील कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या या आठवड्यात अचानक वाढली असताना दुसरीकडे ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटचा राज्यात शिरकाव झाल्याने काहीशी चिंता व्यक्त होत आहे.

वैश्विक महामारी मानवाची काही पाठ सोडायला तयार नाही. सलग तीन वर्षे त्याचे सावट कायम आहे. कोरोनाचा संसर्ग कमी-जास्त होत असताना त्याचे नवनवीन प्रकारही वेळोवेळी आलेले आहेत. आता ओमायक्रॅानचे बीए.4 आणि बीए.5 हे नवे विषाणू पसरू लागले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात आढळलेले सर्व सातही रुग्ण पुण्यातील आहेत. राज्यात कोरोनाचा पहिला रुग्णदेखील पुण्यातच आढळला होता. कोरोनाची साथ आटोक्यात आली तरी पुण्यात बर्‍यापैकी रुग्ण सक्रिय होते. त्याच पुण्यात पुन्हा वेगळे रुग्ण आढळून आले आहेत. यात चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. यापैकी दोघांचा दक्षिण आफ्रिका आणि बेल्जियम प्रवास झाला आहे. तीन जणांनी देशांतर्गत केरळ आणि कर्नाटक येथे प्रवास केला आहे, तर उर्वरित दोघांनी प्रवास केलेला नाही. कोरोना विषाणूचा नव्या उपप्रकाराचा फारसा धोका नाही, पण आंतरराष्ट्रीय स्तरावरील आलेख पाहता त्याच्या प्रादुर्भावाचा वेग लक्षणीय आहे. आता इथे रुग्णवाढ कशी होते यावर त्याची आपल्याकडील वाटचाल अवलंबून असेल. सध्या समस्त देशवासीयांचे डोळे मान्सूनकडे लागले आहेत. यंदाचा उन्हाळा प्रचंड दाहक आहे. गेल्या काही वर्षांतील उष्णतेचे विक्रम मोडले गेले आहेत. अशातच कोरोनाचा नवा विषाणू डोके वर काढू लागला आहे, पण घाबरण्याचे कारण नाही, कारण या संकटावर आपण यापूर्वी मात केलेली आहे. मागील लाट तर थोपवून धरण्यात आपण यशस्वी ठरलो. त्याचप्रमाणे मागे जेव्हा असे नवे उत्प्रेरक आले तेव्हा खूप भीती घातली गेली होती. प्रत्यक्षात त्याचा परिणाम तेवढा जाणवला नव्हता. त्यामुळे आता लोक निर्धास्त आहेत. कोरोनाच्या दोन लाटांनंतर आता कुठे विस्कटलेली घडी बसू लागली आहे. आर्थिक व्यवहार रूळावर येऊन जनजीवन पूर्ववत झाले आहे. त्याआधीची परवड सर्वांनीच अनुभवलेली आहे. कोरोनाने बिकट अवस्था केली होती. त्यामुळे आता ते कटू अनुभव नको, अशीच सगळ्यांची इच्छा आहे. नवा विषाणू तितकासा घातक नसला आणि आता एकूणच कोरोना आपण अनुभवला असला तरी निष्काळजीपणा करून चालणार नाही. कोरोनाचे मूलभूत नियम पाळले पाहिजेत. किमान गर्दीच्या ठिकाणी तोंडाला मास्क बांधणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे ज्यांनी आतापर्यंत लसीचे किमान दोन डोस घेतलेले नसतील त्यांनी ते घेतले पाहिजे. लहान मुलांच्या लसीकरणावर भर देणे गरजेचे आहे. लसीमुळे कोरोनाची तीव्रता आणि मृत्यूचे प्रमाण निश्चितपणे आटोक्यात आलेले आहे. कोरोना महामारी इतक्यात समूळ नष्ट होणार नाही हे तर सर्वांच्या ध्यानात आलेले आहे. त्याच्यापासून आपला बचाव करण्यासाठी स्वतःसह कुटुंबाची आणि पर्यायाने समाजाची काळजी घेत राहणे काळाची गरज आहे. विशेष म्हणजे कोरोनातून माणूस बरा होऊ शकतो. कोरोनाची एकंदर पार्श्वभूमी पाहता अतिआत्मविश्वास नको आणि बेफिकिरी तर मुळीच नको!

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply