Breaking News

मच्छीमारांना सतावतेय सागरी प्रदूषणाची भीती!

उरण ः रामप्रहर वृत्त  : रायगड जिल्ह्याचा 240 किमीचा विस्तीर्ण सागरी किनारा मासेमारीसाठी अनुकूल असला, तरी मागील काही वर्षात या किनारपट्टीवर प्रदूषण वाढले आहे. आर्थिक लाभासाठी केल्या जात असलेल्या बेसुमार मासेमारीमुळे किनार्‍याच्या परिसरात आढळणार्‍या माशांच्या विविध जातीही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी पारंपरिक व्यवसाय करणार्‍या मच्छीमार बांधवांना मत्स्यदुष्काळाची चिंता सतावू लागली आहे.

रायगड जिल्ह्यांतील उरणमध्ये करंजा-मोरा हा परिसर मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. या किनार्‍यावर कोळी समाजाची मोठी वस्ती आहे. या समृद्ध सागरी किनार्‍याने कोळी समाजाची नेहमीच भरभराट केली आहे. आजही येथे पारंपरिक पद्धतीने सुरू असलेला मासेमारीचा व्यवसाय कोळी बांधवांच्या रोजीरोटीचे मुख्य साधन आहे. काही मच्छीमारांनी पारंपरिक पद्धतीमध्ये बदल घडवून या व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाची साथ धरून व्यवसायवृद्धी आणली आहे. आजही उरणच्या खाडी किनार्‍यावर कोळी समाजाचा मासेमारी हाच प्रमुख व्यवसाय आहे.

या खाडीत मिळणारे बोंबिल, ढोमी, मांदेली, घोळ, कलेंट, कोलंबी, शिंगाली, चिंबोरी, खुबे, कालवे, निवट्या इत्यादी माशांचे प्रकार हे कोळी बांधवांना दैनंदिन रोटीरोजी मिळवून देतात. त्यामुळे तेथील कोळी बांधवांनी माशांची निर्यातही सुरू केली आहे. यासाठी उरण दिघोडे गावात मत्स्यप्रक्रियेचा सहकारी कारखानाही सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणाहून मिळालेली मासळी केवळ महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातच पाठविली जात नसून देशांतील सर्व राज्यांत ती पाठविली जात आहे, परंतु गेल्या काही वर्षात या व्यवसायात अनेक अडचणी उद्भवू लागल्या आहेत. जलप्रदूषणामुळे या व्यवसायावर फार मोठे संकट आले आहे. त्यामुळे किनार्‍यालगत आणि खाडीत मासळीचे प्रमाण घटले आहे. मध्यंतरी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन या संस्थेने मुंबई परिसरातील व किनारपट्टीच्या परिसरात मत्स्यव्यवसायावर संशोधन केले. या संस्थेच्या अहवालानुसार मुंबई, रायगडच्या सागरी व खाडी परिसरातील 125 माशांच्या जाती होत्या. त्यापैकी आता फक्त 78 जाती शिल्लक आहेत. 10 ते 15 वर्षाच्या काळांत या ठिकाणी अतिरिक्त मासेमारी करण्यात आली शिवाय मासेमारीसाठी पर्शियन जाळ्यांचा वापर, तसेच एलईडी पद्धतीने मासेमारी करण्यात आली. यामुळे मासेमारी मोठ्या प्रमाणात झाली.

आता पनवेल कोळीवाडा हे क्षेत्र नवी मुंबई विमानतळ बाधित झाले, तर माजगाव, मुरूड, नांदगाव, एकदा, राजापुरी दिघी, तुरुंबाडी, आदगाव, भरडखोल, बोर्ली, कोरली ही सर्व गावे दिघी पोर्टमुळे बाधित होणार आहेत. उरण तालुक्यातील जेएनपीटी बाधित गव्हाण हनुमान कोळीवाडा, पाणजे गाव, करंजा इन्फ्रा प्रोजेक्टमुळे बाधित करंजा गाव व सात पाडे या समुद्रकिनार्‍यावरील खाडीलगतच्या परिसरातील मासे कमी झाल्याने येथील कोळी समाजावर उपासमारीचे सावट आहे.

डिझेल परतावा, होड्या बांधणी व दुरुस्तीसाठी आवश्यक जागा नसणे, मासळी सुकविण्यासाठी जागा नसणे, कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था नसणे, महिलांना मासे विक्रीसाठी अपुरी व्यवस्था असणे यातच तिसरी मुंबई घोषित केल्याने या भागात येणारे नवे प्रकल्प व कोस्टल रोड, बेसुमार खारफुटीची कत्तल यामुळे या क्षेत्रांतील भागातून नाहीशा होणार्‍या माशांच्या जाती याला जबाबदार कोण? असा प्रश्न पडला आहे.

अशी अनेक संकटे, समस्या आज पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणार्‍या मच्छीमार बांधवांच्यासमोर आव्हान म्हणून उभे ठाकले आहे. अशा स्थितीत शासन केवळ घोषणाबाजी पलीकडे काही करू शकले नाही. तेव्हा वर्षानुवर्षे दर्यासारंग हा उपेक्षितच राहिला आहे. त्याच्या जोडीला साथ आहे ती केवळ सागराची, स्वतःच्या कर्तृत्वाची, जमिनी प्रकल्पाला दिलेले भूमिपुत्र आणि बंदराच्या वाढत्या विकासासामुळे आणि सागरी प्रदूषणामुळे मत्स्य दुष्काळात सापडलेले सागरपुत्र आजच्या विकासामुळे देशोधडीला लागले आहेत. या सागरपुत्रांच्या समस्यांची कुणीही लोकप्रतिनिधी दखल घेताना दिसत नसल्यामुळे आज सागरपुत्राला सागरी लाटांबरोबर झुंज देण्यापेक्षा विकासाच्या लाटांनी ओलाचिंब होणार्‍या सागरी किनार्‍याच्या प्रदूषणाची भीती जास्त वाटते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply