नवीन पनवेलमध्ये अवयवदान अभियान आणि मोफत नेत्र तपासणी शिबिर
पनवेल ः रामप्रहर वृत्त
अवयवदान हे श्रेष्ठ दान आहे. त्यामुळे मरावे परी अवयवरूपी उरावे या भावनेतून आपण संकल्पबद्ध व्हा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेलमध्ये अवयवदान अभियानावेळी केले.
जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र आणि स्वानंदयोग साधना केंद्राच्या वतीने अवयवदान अभियान आणि मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 16) नवीन पनवेल सेक्टर 19मधील श्री संत साईबाबा प्राथमिक विद्यालयात करण्यात आले होते. अवयवदानाच्या जनजागृतीसाठी जीवनविद्या मिशन, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग आणि विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयाने हे अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत हृदय, यकृत, फुफ्फुस, मूत्रपिंड, स्वादुपिंड, आतडी, डोळे, त्वचा, हृदयाच्या झडपा आणि कानाचे पडदे अशा अवयवांचे दान करता येते.
नवीन पनवेलमध्ये झालेल्या या अभियानात 65हून अधिक जागृत नागरिकांनी अवयवादानाचे संमतीपत्र सादर केले. या वेळी प्रसिद्ध पॅथॉलॉजी डॉ. आरती मलिक, डॉ. मकरंद निकुंभ, स्वानंदयोग साधना केंद्र पनवेलचे अध्यक्ष भारत नागे, सचिव किरण वाणी, खजिनदार भालचंद्र देसाई, कार्याध्यक्ष अरुण नाईक आदी उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी अवयवदानापेक्षा दुसरे कोणते पुण्याचे काम हे समाजामध्ये असू शकत नाही, असे सांगून तुकाराम बीजच्या पवित्र दिनी आयोजित या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले.
दरम्यान, या कार्यक्रमापूर्वी अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी नवीन पनवेल परिसरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.