रसायनी : प्रतिनिधी : रणरणत्या उन्हामध्ये अंगाची लाही होत असताना नागरिक स्वतःच्या आरोग्याची खबरदारी घेत आहेत. यामुळे या उन्हाळ्यामध्ये आपली तृष्णा शांत करण्यासाठी मिनरल वॉटर घेण्याकडे आनेकांचा कल आहे. त्यामुळे बाजारात मिनरल वॉटरच्या मागणीत वाढ झाली आहे.
पूर्वी प्रत्येक ठिकाणी वाटसरूची तहान भागविण्यासाठी पाणपोया उपलब्ध असायच्या, मात्र आता आरोग्याचा विचार करून प्रत्येक जण बिसलेरीचा वापर करीत असल्याचे दृश्य अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे. पानटपरी, हॉटेल, किराणा दुकान, लहान व्यावसायिक यांच्याकडे मिनरल वॉटर सहजपणे उपलब्ध होत असल्याने नागरिकांची तहान भागविण्याला त्यातून मदत होत आहे, तर कोणी घरातील पाणी घेऊन प्रवास करत असतात.
सध्या उन्हाची दाहकता जाणवू लागली असून शरीराची लाही-लाही होऊ लागली आहे. त्यातच लग्नसराई असल्याने बाहेरगावाहून येणार्या-जाणार्या लोकांची संख्या वाढली आहे. भर उन्हात तहान भागविण्यासाठी पाणपोई उपलब्ध राहीलच अशी स्थिती सध्या दिसत नसल्याने पाणी पाऊच, मिनरल वॉटरच्या बॉटलची खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याच्या व्यवसायात तेजी आली आहे.
पाणपोई या स्थळाला जात, धर्म, पंथ असा भेदभाव नसतो. तेथे फक्त मानवता हाच धर्म अनुभवावयास मिळतो. म्हणून पाणपोई हे पवित्र स्थळ असून ते माणसा-माणसांना जोडणारे केंद्र म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. आज मिनरल वॉटर, पाणी पाऊच सहज मिळत असल्याने पाणपोईची गरज काय? असाही प्रश्न कोणी उपस्थित करतील. तथापि ज्यांची पाऊच घेण्याचीही ऐपत नाही, ज्यांच्या अंगावर धड कपडेही नाही अशा लोकांची पाण्याची तहान भागणार कशी? हाही प्रश्न आहे. म्हणून या अर्थाने पाणपोईला अनन्यसाधारण महत्त्व असून उन्हाळ्याच्या चार महिन्यांत तिचे अनमोल स्थान कुणालाही नाकारता येणार नाही.