उरण : वार्ताहर
उरण परिसरातील मोरा कोळीवाडा, बोरी, केगाव, अंबिका वाडी, श्री स्वामी समर्थ मठ विनायक, तेलीपाडा, मुलेखंड आदी ठिकाणी साई बाबा मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
उरण केगाव ग्रामपंचायत हद्दीतील विनायक कोळी वाडा येथील एक मुखी दत्त मंदिरात भजन महाआरती, पालखी उत्सव, महाप्रसाद आदींचे आयोजनक करण्यात आले होते. हजारो भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला, असे मंदिराचे मालक जगदीश कोळी यांनी सांगितले.
श्री स्वामी समर्थ माठ विनायक येथे हि भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. उरण शहरातील आनंद नगर येथील श्री स्वामी समर्थ आध्यत्मिक व बाल विकास समाज मंदिर (दिंडोरी प्रणित) उरण येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सकाळी भूपाळी, श्री स्वामी समर्थ अभिषेक श्री स्वामी सारामृत वाचन हवन नैवेद्य आरती, औदुंबर प्रदक्षिणा सायंकाळी नैवेद्य आरती आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पनवेलच्या श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यासह सर्वदूर ख्याती असलेल्या शहरातील गावदेवी पाडा येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे शासनाच्या निर्देशानुसार मोजक्या सेवेकर्यांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत होता, मात्र यंदा कोरोनाचे सावट टळल्याने असंख्य भाविकांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.
गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर श्री स्वामी समर्थांच्या मठात आकर्षक फुलांची सजावट आणि रोषणाई करण्यात आली होती. दरवर्षी मठात गुरुपौर्णिमेनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. परमपूज्य नाना महाराज यांच्या आशीर्वादाने मठाधिपती स्वामीभक्त सुधाकर भाऊ घरत यांचे सेवा कार्य अविरतपणे सुरू आहे. गेली 35 ते 40 वर्षे दत्तजयंती, स्वामी समर्थ प्रकटदिन, गुरुपौर्णिमा, गोपाळकृष्ण जयंती, गणेशजयंती, हरिपाठ, स्तोत्रपाठ, नित्य कीर्तने, प्रवचने, महाप्रसाद यासह विविध धार्मिक सोहळ्याचे याठिकाणी आयोजन करण्यात येते.
गुरुपौर्णिमेनिमित्त विद्याभवनमध्ये विविध उपक्रम
नवी मुंबई : बातमीदार
पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरुळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलात गुरुपौर्णिमेनिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले.
मुख्याध्यापक राजेंद्र ढेरगे आणि सुवर्णा मिसाळ यांच्या हस्ते व्यासगुरुंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. माध्यमिक तसेच प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनीं गुरुपौर्णिमेनिमित्त आपले विचार व्यक्त केले. शिक्षक अविनाश कुलकर्णी यांनी गुरुपौर्णिमा साजरी करण्यामागील उद्देश व्यक्त केला. मुख्याध्यापक राजेंद्र ढेरगे यांनी ज्ञानाशी एकरूप राहण्याचा सल्ला दिला. श्रुती कुलकर्णी आणि अनघा घनवट या विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विषयास अनुसरून स्मरणशक्ती स्पर्धा, भेटकार्ड बनवणे स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, छत्री रंगवणे स्पर्धा असे उपक्रम घेण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे औक्षण केले. शालिनी औचर यांनी शिक्षकांसाठी आरोग्यविषयक उपकरणे देणगीरूपात दिली.