Breaking News

बाजारातील ऑप्शनचा खेळ आणि जोखीम!

प्रत्येकजण बाजारात पैसेच कमावण्यासाठीच येत असतो, परंतु प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी. जेव्हा ही पद्धत जुगार खेळण्याच्या भावनेने अवलंबली जाते तेव्हा त्यासाठी केली जाणारी ही गुंतवणूक ठरत नाही तर त्यास सट्टा म्हटले जाते. ज्यासाठी असंख्य ऑप्शन ट्रेडर्स हे बाजारात जोखीम घेत असतात. बहुतांशी ट्रेडर्स हे दृश्य जोखीम सांभाळून मर्यादित नुकसान आणि अमर्यादित नफा कमाविण्याच्या दृष्टीने आपल्या पोझिशन्स घेत असतात.

’आठवडी बाजार’ हा भारताच्या सांस्कृतिक आणि पारंपरिक वातावरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे अनौपचारिक बाजार आठवड्यातून एका ठराविक दिवशी व विशिष्ट ठिकाणी भरविले जातात. सर्वसाधारणपणे गावातील वर्दळीच्या ठिकाणी असे आठवडी बाजार भरतात.हेतू एकच की, उत्पादक व ग्राहक यांचा थेट संबंध जोडणे. धान्य, भाजीपाला, फळे अशा दैनंदिन जीवनावश्यक गोष्टी पुरवण्यासाठी आठवड्यातून एकदा स्वतः शेतकरीदेखील हजेरी लावतात तर इतर वस्तू उत्पादक , कला प्रदर्शक, घरगुती पदार्थ उत्पादक, जुनाट वस्तू विकणारे या दिवशी आपल्या गोष्टी विकण्यास तत्पर असतात. त्यामुळे असा वैविध्यपूर्ण बाजार थोरामोठ्यांसाठी कुतूहलाची गोष्ट असते. मॉल संस्कृती व ऑनलाईन खरेदीमुळे आज मोठ्या शहरांमध्ये जरी ही पद्धत संपूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर असली तरी काही छोट्या शहरात ही पद्धत अजूनही जोपासली जाते.

याव्यतिरिक्त शेअर बाजारात देखील असा आठवडी बाजार असतो. ज्यास आपण वीकली एक्स्पायरी म्हणून ओळखतो. राष्ट्रीय बाजारामधील निफ्टी, बँकनिफ्टी व आता फिननिफ्टी या निर्देशांकांवरील ऑप्शन्स काँट्रॅक्ट हे एक आठवड्याच्या मुदतीचेदेखील उपलब्ध आहेत. दर आठवड्याच्या गुरुवारी हे ऑप्शन्स एक्स्पायर होतात, म्हणजेच अशा ऑप्शन्समध्ये व्यवहार करण्याची मुदत ही प्रत्येक शुक्रवार ते पुढील गुरुवार अशी 5 दिवसांची असते.

मागच्याच गुरुवारी म्हणजे 23 जून रोजी संपलेल्या अशा आठवडी बाजारात खूप जास्त चंचलता अनुभवली गेली. बँक निफ्टी या निवडक बँकांच्या समुदायाचे प्रतिनिधित्व करणार्‍या निर्देशांकातील 33000 ची स्ट्राईक प्राईस असलेल्या ऑप्शन काँट्रॅक्टने केवळ सहा तासांत तुफान करामत दाखविली.

जास्त खोलात न शिरता थोडक्यात म्हणजे, आठवड्याच्या मुदतीत व्यवहार करण्यासाठी असलेला एक प्रकार (ऑप्शन) ज्याचे मूळ असलेला बँकनिफ्टी निर्देशांक हा 33000 पातळीवर जितक्या अंशाने बंद होईल तितकी या 33000 स्ट्राईक प्राईस कॉल ऑप्शन काँट्रॅक्टचा भाव असेल म्हणजेच जर बँक निफ्टी निर्देशांक गुरुवारी जर 33050 ला बंद झाल्यास, या ऑप्शनचा बंद भाव 50 रुपये असेल.  तर या ऑप्शनचा दिवसाच्या सुरुवातीचा भाव 274 वरून 65, नंतर 65 वरून 460 तर नंतर 460 वरून थेट 13, मग 13 पासून 305, पुन्हा 305 हून 46, परत 46 वरून 309 आणि सरतेशेवटी 135 वर बंद झाला. अशी वेडीवाकडी वध-घट अनेक वर्षांनी अनुभवायला मिळाली. अर्थातच यामधून अनेक ऑप्शन ट्रेडर्सना मोठे नुकसान सोसावे लागले असू शकते.

खरंच, संभाव्यता व त्यानुसार मिळणारा नफा हा खरेच अनाकलनीय विषय आहे. समजा एखाद्यास विचारले की पुढील आठवड्यात बाजार वर जाईल की खाली आणि जर त्याचं उत्तर ’वरती’ असे असेल तर जितके पैसे तो बाजार वर जाणार या अपेक्षने लावेल त्याच्या काही प्रमाणात त्यास परतावा मिळेल जो फार काही आकर्षक नसेल. परंतु समजा त्याच्या अपेक्षेच्या विरुद्ध जाऊन बाजार पडण्यावर लावलेले पैसे त्यास अधिक जास्त कमाई करून देऊ शकतील.

यासाठी आपण क्रिकेट जगतातील सर्वांत गाजलेल्या मॅचचे उदाहरण घेऊया. 12 मार्च 2006 साली जोहान्सबर्गच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 434 धावा काढल्या होत्या. साहजिकच त्या वेळेस ऑस्ट्रेलियाच जिंकणार हे छातीठोकपणे कोणीही सांगू शकत होते, समजा त्या वेळी जर  ऑस्ट्रेलिया जिंकणार म्हणून कोणी पैज लावायला आले असते तर? त्याला कोणीही भाव दिला नसता कारण उघडउघड दिसतेय की ही मॅच ऑस्ट्रेलियाच जिंकेल.

परंतु ऑस्ट्रेलियाची इनिंग झाल्या झाल्या समजा कोणी सांगितले असते की दक्षिण आफ्रिका ही मॅच जिंकेल, तर त्याला वेड्यात काढून कोणीही त्याच्याशी पैज लावायला तयार झाले असते. कारण ऑस्ट्रेलियावरील पैज हरण्याचा धोका हा अशक्य होता. परंतु सर्व सहज वर्तवलेल्या संभाव्यता खोट्या ठरवत दक्षिण आफ्रिकेने ती मॅच 1 चेंडू व 1 गडी राखून जिंकली. क्रिकेट जाणकारांसाठी ही बाब नक्कीच आश्चर्यकारक होती. वास्तव अशक्य पण सत्य होते. म्हणजेच वर म्हटल्याप्रमाणे probability doesn’t matter but Pay-Offs do! म्हणजेच, संभाव्यता काही मायने ठेवीत नाही परंतु मिळणारा नफा हाच महत्त्वाचा असतो.

इथे लॉटरीचेदेखील उदाहरण नमुन्या दाखल घेता येईल. दैनंदिन लॉटरीमध्ये एका नंबरवर पैसे लावले जातात आणि तुम्ही ज्या नंबरवर पैसे लावलेले असतात तो नंबर लॉटरी नंबर ठरल्यास तुमच्या लावलेल्या रकमेच्या काहीपट रक्कम तुम्हाला बक्षीस म्हणून मिळते ज्याची शक्यता हजारांत एकदा असते. याबद्दल साधा युक्तिवाद म्हणजे प्रत्येक आकड्यावर एकूण किती रक्कम लावली गेलेली आहे हे लॉटरी मालकास माहिती असते आणि सर्वांत कमी रक्कम ज्या आकड्यावर लावली गेलेली असते तोच नंबर लॉटरी नंबर म्हणून घोषित केला जातो, त्यामुळं बाकीच्या सर्व आकड्यांवर लागलेले पैसे वाया जाऊनहा त्या मालकाचा फायदा असतो.  अगदी असंच उदाहरण शेअर बाजारातीलऑप्शन मार्केट मध्ये दिसून येते.

कोणत्यातरी एकाच भावात निर्देशांक बंद होणार असल्यानं, त्यामुळं त्या विशिष्ट भावांव्यतिरिक्त इतर सर्व स्ट्राईक प्राईसच्या ऑप्शन्सचा भाव शून्य होतो. यालाच ऑप्शन मार्केटमध्ये ऑप्शन पेन किंवा मॅक्स पेन संबोधले जाते.

प्रत्येकजण बाजारात पैसेच कमावण्यासाठीच येत असतो, परंतु प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते. जेव्हा ही पद्धत जुगार खेळण्याच्या भावनेने अवलंबली जाते तेव्हा त्यासाठी केली जाणारी ही गुंतवणूक ठरत नाही तर त्यास सट्टा म्हटले जाते. ज्यासाठी असंख्य ऑप्शन ट्रेडर्स हे बाजारात जोखीम घेत असतात.

बहुतांशी ट्रेडर्स हे दृश्य जोखीम सांभाळून मर्यादित नुकसान आणि अमर्यादित नफा कमावण्याच्या दृष्टीने आपल्या पोझिशन्स घेतात. नक्कीच यात गैर वाटण्यासारखे काहीच नाही. परंतु खरी गुंतवणूक म्हणजे काही जुगार नव्हे. अशा ठिकाणी कधीच ’हे’ नाहीतर ’ते’ अशी परिस्थिती नसते, क्वचीतच अशी परिस्थिती (संधी) मिळू शकते,  जिथं रंकाचा राजा होत असतो.  परंतु, प्राथमिकतः कोणत्याही ट्रेडर अथवा गुंतवणूकदारांने अशीच रक्कम गुंतवावी अथवा ट्रेडिंगसाठी लावावी. ज्यामुळे त्याच्या दैनंदिन जीवनावर कोणताही परिणाम होणार नाही आणि त्याचे अथवा तिचे आर्थिक भवितव्यदेखील धोक्यात येऊ शकणार नाही. म्हणजेच, Never bet the amount that you can’t afford to lose, दुसर्‍या शब्दांत सांगायचे झाले तर जितकी रक्कम आपण सहज गमावू शकतो तितकीच रक्कम ट्रेडिंगसाठी गुंतवणूक म्हणून वापरावी.

वाचकांनी पुन्हा लक्षात घ्यावे की हे व्यवहार लॉटरीच्या व्यवहारासारखे आहेत. तुम्ही कॉल किंवा पुट ऑप्शन खरेदी करताय म्हणजे समजा लॉटरीचे तिकीट खरेदी करताहेत. त्या बाबतीत निर्देशांक अथवा शेअरभाव कितीही वरती / खाली झाले किंवा अपेक्षेप्रमाणे त्यामध्ये अजिबात हालचाल झाली नाही तरीही होणारे नुकसान हे ऑप्शनच्या खरेदी किंमतीइतकेच मर्यादित असते आणि म्हणूनच बव्हंशी ट्रेडर्स हे असे  ऑप्शन्स खरेदी करताना आढळतात.

अशा व्यवहारांमध्ये साधारणपणे गुंतवणुकीच्या तिप्पट अथवा चौपट परतावा मिळाल्यास नफा पदरात पडून घेणे इष्ट ठरू शकते. जितकी स्ट्राईक प्राईस लांबची तितकी जोखीम कमी व तेथपर्यंत निर्देशांकाचा भाव जाण्याची शक्यतादेखील कमी. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि पद्धती. यामुळे प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला यातील काय झेपते, हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे, हे मात्र निश्चित आहे.

-प्रसाद ल. भावे, अर्थप्रहर

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply