वाळू वाहून गेल्याने अवैध उपसा करणार्यांची धांदल
पोलादपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील रानबाजिरे धरण गेल्या वर्षी ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले होते. या पार्श्वभूमीवर हे धरण उशिराने भरावे, यासाठी गेल्या महिन्यापासून धरणातील पाणी सावित्रीत सोडले जात आहे. त्यामुळे नदीपात्रातील वाळू वाहून गेल्याने अवैध वाळू उपसा करणार्यांची धांदल उडाल्याचे दिसून येत आहे. पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या धरणातील पाण्याची पातळी गेल्या वर्षी 22 जुलै 2021 रोजी चक्क 57.60 मीटर एवढी वाढून होती. ती रातोरात धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचण्याची वेळ आली होती. या अनुषगाने यंदा रानबाजिरे धरणातील बँकवॉटर मे महिन्यापासून सावित्री नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे पाऊस सुरू होण्याआधी धरणातील पाण्याची पातळी खूप खाली जावून अतिवृष्टीकाळात धरणातील पाणी धोक्याची पातळी ओलांडणार नाही, असा प्रशासनाचा हेतू होता. रानबाजिरे धरणातील बँकवॉटर सोडल्याने दिविल ते सवाद गावांतील सावित्री नदी पात्रात वाळू, रेजगा तसेच दगड-गोट्यांचा उपसा करणार्यांनी काढून ठेवलेली वाळू सर्वात आधी वाहून गेली. त्यामुळे नदीपात्रात दगड-गोटे-रेजगा यांचा अवैध उपसा करणार्यांनी महाड एमआयडीसी अभियंत्यांच्या नावाने शंख करण्यास सुरूवात केली. दरम्यान, रानबाजिरे धरणाच्या बँकवॉटरचे क्षेत्र जवळपास 75 टक्के रिकामे झाले असल्याने यंदा धरण भरण्यास गेल्या वर्षीपेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रानबाजिरे धरणातील पाणी मे महिन्यापासून सातत्याने सोडल्याने सावित्री नदीत पुरसे पाणी होते. त्यामुळे नदी लगतच्या गावांमध्ये कपडे व भांडी धुण्यासाठी तसेच अन्य कामासाठी पाण्याची कमतरता जाणवली नाही.