अनेक गुन्ह्यांची केली उकल
कर्जत : बातमीदार
कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आजवर झालेल्या छोट्या मोठ्या गुन्ह्यांची उकल जलद गतीने करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी या गुन्ह्यांचा छडा लावल्याने त्यांचे आणि त्यांच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे
कर्जत रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत दीपक शेखर रेड्डी हा संशयास्पदरित्या फिरताना आढळून आल्याने पोलीस शिपाई शिर्के, पोलीस नाईक जगदाळे यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळील बॅगेत सुमारे 90 हजार रुपये किमतीचे तीन लॅपटॉप मिळून आले. ते दोन पंचांसमक्ष जप्त करण्यात आले. न्यायालयाकडून तपासाची परवानगी घेऊन सदर लॅपटॉप चालू करुन लॅपटॉपचे मालक रमेश ईश्वरकर यांना रेल्वे पोलिसांनी संपर्क केला. हे लॅपटॉप मी आणि माझे मित्र गुरुतेज सिंह यांचे असून ते भिवंडी येथे उभी करून ठेवलेल्या ब्रिजा गाडीतून चोरीस गेले होते. त्याबाबत नारपोली (भिवंडी) पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असल्याची माहिती रमेश ईश्वरकर यांनी दिली.
कर्जत रेल्वे पोलिसांनी नारपोली पोलीस ठाण्यात संपर्क करून चोरीस गेलेले लॅपटॉप मिळाल्याची माहिती दिली. नारपोली पोलिसांनी सदर गुन्ह्यात कल्याण लोहमार्ग न्यायालयाकडून दीपक शेखर रेड्डी या आरोपीचा ताबा घेतला आहे.