अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील 32 विद्यार्थील युक्रेनमध्ये अडकलेले होते. यातील 31 विद्यार्थी रायगडात परतले असून, उर्वरीत एक विद्यार्थीही परतीच्या मार्गावर आहे. तो पोलंडमध्ये दाखल झाला आहे. जिल्ह्यातील 32 विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेले होते. रशियन फौजांच्या आक्रमणामुळे हे सर्व विद्यार्थी युक्रेनमधील अडकून पडले. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आले होते. यासाठी युक्रेन लगत असलेल्या रोमानिया, पोलंड देशात दररोज खास विमाने पाठविली जात होती. युध्दपरिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर पडणे मुश्कील झाले होते. मिळेल त्या वाहनाने त्यांना सिमेवर दाखल होण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. खार्कीव आणि सुमी या परिसरातील विद्यार्थ्यांची सर्वाधिक कोंडी झाली होती. अनेक अडचणींना सामोरे जात त्यांनी अखेर सिमाभाग गाठला. यासाठी काही मुलांनी तर चाळीस ते पन्नास किलोमीटरची पायपीटही केली होती. दरम्यान, जिल्ह्यातील 32 विद्यार्थ्यांपैकी 31 विद्यार्थी हे आता सुखरुप घरी परतले होते. पेण येथील कल्पित सुधीर मढवी हा विद्यार्थी सुमी शहरात अडकून पडला होता. तोदेखील आता पोलंड मध्ये सुखरूप दाखल झाला आहे. त्यामुळे लवकरच तो भारतात परतेल अशी अपेक्षा आहे.