फळबाग लागवडीतून शेतकर्यांना हमखास उत्पन्न मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे गेल्या 20-25 वर्षांमध्ये फळबाग लागवडीकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे. फळझाडांची वाढ नीट होण्यासाठी योग्य पाणीव्यवस्थापन हा महत्त्वाचा घटक ठरतो. तथापि, अलीकडील काळात पाणीटंचाई, दुष्काळासारख्या समस्येमुळे फळशेतीचे नुकसान होत आहे. तथापि, या काळात फळझाडांना ठिबक सिंचन, मडके सिंचन यांचा वापर करून पाणी देण्याचा पर्याय आहे.
पाऊस कमी पडतो तेव्हा हवेतील उष्णता वाढते. परिणामी जमिनीतील पाणी शोषले जाते. असे बाष्पीभवन पिकांच्या वाढीला हानीकारक ठरते. कारण बाष्पीभवनाने जमिनीतील 70 टक्के पाणी उडून जाते असे दिसले आहे. जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये याकरिता शेतातील काडीकचरा, पिकांची धस्कटे, गवत, तुरकाट्या, गव्हाचा भुस्सा यांचा वापर करून जमिनीवर आच्छादन तयार करावे. बाष्पीभवनाला प्रतिबंध झाल्यास जमिनीतील पाणी टिकून रहाते. कमी पाऊस पडला तरी जमिनीवरच्या आच्छादनामुळे फळबागा जिवंत राहतात, पिकांची वाढ चांगली होते. त्याचबरोबर ठिबक सिंचन, मडका सिंचन या पद्धतीद्वारेही फळबागांना पाणी देता येते. ठिबक सिंचनाचे महत्त्व शेतकर्यांना कळले आहे. ठिबक सिंचनाद्वारे फळबागेतील झाडांना मर्यादित पाणीपुरवठा केला तरी ती झाडे दुष्काळी स्थितीतही जगू शकतात. त्याकरिता फळबागेतील प्रत्येक झाडाला दीड ते दोन लिटर पाणी दिले पाहिजे. त्याचबरोबर झाडांच्या आळ्यामध्ये मडके बसवून त्याद्वारेही फळबागांना पाणी पुरवले जाते. अशा मडक्याच्या खालच्या भागात लहान छिद्र पाडले जाते आणि या छिद्राला चिंधी बांधली जाते. अशा मडक्यामध्ये दररोज दीड ते दोन लिटर पाणी ओतल्यास ते पाणी हळूहळू ठिपकत राहते आणि झाडे जगतात.
फळबागातील झाडाच्या खोडांच्या भोवतीने मातीची भर दिली तर त्याचाही उपयेाग आच्छादनाप्रमाणे होतो. यामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. दुष्काळी स्थितीमध्ये फळबागेतील झाडांवर कोणताही बहर धरू नये असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दुष्काळामध्ये झाडांना फुले लागल्यास ती काढून टाकावीत. टंचाईग्रस्त परिस्थितीत झाडांचा आकार मोठा झाला तर तो छाटून टाकावा. झाडांचा सांगाडा विशिष्ट मर्यादेत ठेवल्यास पानांची संख्या कमी होते. परिणामी बाष्पीभवनही कमी प्रमाणात होते. फळबागांवर रोग पडू नयेत याकरिता झाडांच्या खोडाला बॉडीपेस्ट लावली जाते. त्याचबरोबर म्युरेट ऑफ पोटॅशचा फवारा केल्यास टंचाईग्रस्त स्थितीत फळबागेतील झाडे जगून रहाण्यास मदत होते. पाऊसकाळ कमी असेल तर झाडांवर थोड्या प्रमाणात का होईना दररोज पाण्याची फवारणी करायला हवी. असे केल्यास झाडे जगण्यास मदत होते. त्याचबरोबर जमिनीचा पोत वाढवल्यास त्याद्वारेही फळबागातून अधिक प्रमाणत उत्पन्न घेता येते.
शेततळे अथवा विहिरींचे पुनर्भरण यांसारख्या मार्गांनी जमिनीतील पाण्याचा साठा वाढविता येतो. शेताजवळ अथवा परिसरात ओढा असल्यास त्या ओढ्याची रुंदी वाढवणे, त्याचे खोलीकरण करणे यासारख्या मार्गांनी ओढ्यामध्ये पाणी साठवता येते. ओढ्यांवर वनराई बंधार्यांमुळे ओढ्यांमध्ये पाणी साठू लागते. त्याचा परिणाम आसपासच्या भागातील विहिरींचे पाणी वाढण्यात होतो या सर्व उपाययोजना केल्यास दुष्काळामध्येही फळबागा जगवणे शक्य होते. आपल्या परिसरात पडणार्या पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी जे शक्य आहे ते सर्व उपाय करा. थोड्याशा पाण्यावरही फळबागा जगू शकतात.
-सतीश जाधव