Breaking News

मंत्री गणेश नाईक, भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा सत्कार

विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

चौक : प्रतिनिधी
राज्याचे वनमंत्री म्हणून गणेश नाईक आणि भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल चौक येथील कर्जत फाटा मैदानात सोमवारी (दि. 20) भाजपच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी विविध पक्षांचे पदाधिकारी, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत ना. नाईक आणि प्रदेश कार्यकारी अध्यक्ष चव्हाण यांनी केले.
या वेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी, राज्यातील जनतेला महायुतीचे सरकार कार्यक्षम काम करणार याची खात्री असल्याने कधीही, कुणाला न मिळालेले यश हे जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पारड्यात दिले. त्यामुळे केवळ मंत्रालयात न बसता जनता दरबार भरवून सामान्यांशी संवाद साधला जाईल आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावू, असे प्रतिपादन केले.
भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य आणि देश विकासाच्या वाटेवर आहे. या दोघांच्या कार्यशैलीने राज्यासह देश प्रगती करीत आहे. अशा वेळी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचण्यासाठी आणि तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम जोमाने सुरू असल्याचे सांगितले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी दोन्ही सत्कारमूर्तींच्या कार्याचा गौरव केला तसेच आमदार महेश बालदी यांचा विकासपुरूष म्हणून उल्लेख करून त्यांच्या कार्याचीही प्रशंसा केली, तर आमदार महेश बालदी यांनी उरण विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी आपण कटिबद्ध असून व्यक्तिगत कामापेक्षा सार्वजनिक कामांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. आदिवासी भागात विकास करताना येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी या वेळी केली तसेच पक्षात येणारा प्रत्येक कार्यकर्ता सारखाच असेल. जुना-नवा भेदभाव केला जाणार नाही, असेही स्पष्ट केले.
सोहळ्यास भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस दीपक बेहेरे, उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, खालापूर मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे, चौक शहर अध्यक्ष गणेश कदम, ज्येष्ठ नेते विनोद भोईर, अभिजित देशमुख, सागर ओसवाल, चौक सरपंच रितू ठोंबरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वनमंत्री गणेश नाईक यांचा सत्कार सुधीर ठोंबरे यांनी, तर प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा सत्कार चौक सरपंच रितू ठोंबरे यांनी केला. सर्व मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे यांनी केले.
या वेळी तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून शिवसेनेतून निवडून आलेले मोतीराम ठोंबरे, वावर्ले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजू मोरे, लोधिवली थेट सरपंच पूजा तवले, चौक पंचायत समिती विभाग प्रमुख जगदीश हातमोडे, उपसरपंच राजन गावडे, अक्षय म्हामुणकर, युवासेना उपतालुकाप्रमुख नितीन तवले, ग्रामपंचायत सदस्य रेखा भुईकोट, सुभाष शिंदे, सुरेखा मोरे, शाखाप्रमुख सुनील गायकवाड, चौकचे माजी उपसरपंच सचिन मते, एकनाथ मते, ग्रामपंचायत सदस्य पूजा हातमोडे, नयना झिंगे, वावंढळ उपसरपंच अमोल कदम, अजिंक्य देशमुख, शरद पिंगळे, बाळू ठाकूर, माजी उपसरपंच हरिश्चंद्र भोसले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते 1300 जणांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. या सर्वांचे स्वागत करण्यात आले. या पक्षप्रवेशामुळे चौक विभागात भाजप अधिक मजबूत झाला आहे.

Check Also

भिंगारी संघाने जिंकला नमो क्रिकेट चषक

पनवेल : रामप्रहर वृत्तनमो चषक 2025 अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी …

Leave a Reply